डिचोली : कारापूर-सर्वण येथे अंतर्गत वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलवण्यात आले. या घटनेत आठ दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी डिचोली पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, कारापूर येथील एका युवकाला धावसकरवाडा-सर्वण येथील युवकाने धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. याबाबत जाब विचारण्यासाठी कारापूर येथील काही युवक दुचाकींवरून सर्वेश धावसकर यांच्या घराबाहेर जमले. यावेळी बाचाबाची झाली. घरातील वृद्ध महिलेला शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर दोन्ही गटांतील लोकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी लोखंडी सळ्या आणि दंडुक्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
या मारामारीत गौरीश घाडी यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांनी हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. धावसकर गटातील रामा ऊर्फ पप्पू धावसकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून टाके घालावे लागले. सतीश घाडी, अजित नार्वेकर, विष्णू मुंजी, निखील मुंजी आणि शिवम सातर्डेकर हेही जखमी झाले आहेत.
दरम्यान, कारापूर येथे येणाऱ्या ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या महाप्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात गौरीश घाडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा समाजकार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला आहे. गावातील वादाचे कारण पुढे करून घाडी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. जमिनींसाठी आंदोलन करणाऱ्या गोमंतकीय भूमिपुत्रांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार सुरू असल्याचेही शेर्लेकर यांनी म्हटले आहे.
आठ दुचाकींची तोडफोड; दोन्ही गटांच्या तक्रारी
कारापूर येथून धावसकरवाड्यावर गेलेल्या युवकांच्या आठ दुचाकींची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दोन्ही गटांतील लोकांनी पोलीस स्थानकात गर्दी केली. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.


