कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके २२ नोव्हेंबरला गोव्यात

‘चल्ला कितें गोंय’ उपक्रमांतर्गत लोकसंवाद; जनतेच्या प्रश्नांचा मागण्यांचा चार्टर सरकारला सादर करणार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th November, 11:43 pm
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके २२ नोव्हेंबरला गोव्यात

पणजी : कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका हे २२ नोव्हेंबरला गोव्यात येणार आहेत. यानिमित्त पणजी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘चल्ला कितें गोंय’ या विषयावर लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून गोमंतकीयांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेऊन त्यांच्या मागण्यांचा चार्टर राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सीजेपीच्या अमरीन शेख यांनी सांगितले की, नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच संघटनेने कोणत्या विषयांवर काम करावे, याबाबत सूचना देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

आम्ही एका विषयावर चर्चा सुरू करतो, तोपर्यंत आणखी दहा विषय समोर येतात. जमीन, सुरक्षा, वाहतूक, कामगारांचे हक्क आणि शिक्षण अशा विविध विषयांवर नागरिकांना आपली मते मांडायची आहेत. मात्र, इतके विषय समोर येत असल्याने नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करावी, हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ‘चल्ला कितें गोंय’ ही मोहीम सुरू केली आहे, असे शेख यांनी सांगितले.

सीजेपीच्या प्रतिनिधी रानी यांनी सांगितले की, नागरिकांना आपले प्रश्न, समस्या आणि मागण्या नोंदवता याव्यात यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. हा कोड स्कॅन करून नागरिकांना आपल्या समस्या नोंदवता येतील. त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे २२ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी प्रश्नांची यादी तयार केली जाणार आहे.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आपले इतर प्रश्न थेट मांडण्याची संधीही मिळणार असल्याचे रानी यांनी स्पष्ट केले.

जनतेचे प्रश्न जाणून घेणे, त्यावर काम करणे आणि नागरिकांचे मुद्दे मागण्यांच्या चार्टरच्या स्वरूपात सरकारसमोर मांडणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अमरीन शेख यांनी सांगितले.