तळेवाडा-बेतोडा येथे काजूबागायतीत प्रकल्प उभारण्याच्या हालचालींमुळे नाराजी

साफसफाई करण्यासाठी आलेल्या कामगारांना स्थानिकांनी हाकलले

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th November, 06:53 pm
तळेवाडा-बेतोडा येथे काजूबागायतीत प्रकल्प उभारण्याच्या हालचालींमुळे नाराजी

फोंडा : तळेवाडा-बेतोडा येथील काजूबागायतीत प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या संशयावरून स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. बुधवारी सकाळी काजूबागायतीत साफसफाई करण्यासाठी आलेल्या १० ते १२ कामगारांना ग्रामस्थांनी एकत्र येत तेथून हाकलून लावले. गावात कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प उभारू देणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बुधवारी सकाळी सुमारे १० ते १२ कामगार तळेवाडा गावातील काजूबागायतीत साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यांनी कामाला सुरुवात केल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी कामगारांकडे विचारपूस केली असता, संबंधित जागेवर प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यानंतर ग्रामस्थांनी कामगारांना तेथून जाण्यास सांगितले.
पूर्वापार गावात शांततेत आणि गुण्यागोविंदाने राहणाऱ्या ग्रामस्थांच्या काजूबागायतीत अचानक अज्ञात व्यक्तींकडून साफसफाई सुरू करण्यात आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. गावात बाहेरील व्यक्तींनी येऊन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
काजूबागायतीवर ग्रामस्थांची उपजीविका
स्थानिक रहिवासी शोभावती गावकर यांनी सांगितले की, गावातील अनेक कुटुंबे काजूबागायतीवर अवलंबून आहेत. या बागायती पूर्वजांपासून स्थानिकांच्या ताब्यात असून, तेथे प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा विरोध आहे. यापूर्वीही स्थानिकांनी अशा प्रकल्पांविरोधात आवाज उठविला होता, असे त्यांनी नमूद केले.
गावातील शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गावातील शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वीही संघर्ष केला आहे. बुधवारी झालेला प्रकार भविष्यात खपवून घेतला जाणार नाही. गावात प्रकल्प उभारल्यास महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती उज्ज्वला गावडे यांनी व्यक्त केली.

सुमारे महिनाभरापूर्वी ग्रामस्थांनी शेतीचे संवर्धन करण्यासाठी एकत्र येत उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर शेतीजवळील कामे सध्या बंद आहेत. बुधवारी पुन्हा सुरू झालेला प्रयत्नही रोखण्यासाठी ग्रामस्थ मागे-पुढे पाहणार नाहीत. - उमेश गावडे, स्थानिक पंच ‍

हेही वाचा
सर्व पहा