पणजी : राज्यात जनगणना २०२७च्या स्व-गणना प्रक्रियेला १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदवता यावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (The Self-Enumeration phase of Census 2027 commenced in Goa). डिचोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोलीतील जनगणना अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण केली.
जनगणना हा देशाच्या विकास नियोजन, धोरणनिर्मिती आणि सार्वजनिक संसाधनांच्या योग्य वाटपासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. या प्रक्रियेत नागरिकांचे वय, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर सामाजिक व आर्थिक बाबींशी संबंधित माहिती संकलित केली जाते. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत संकलित करण्यात आलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.
डॉ. शेट्ये यांनी नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आणि अचूक माहिती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्व-गणना करता येणार आहे.
स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना एक विशेष स्व-गणना ओळख क्रमांक (Self-Enumeration ID) मिळेल. पुढील टप्प्यात जनगणना कर्मचारी घरी भेट देण्यासाठी आल्यानंतर हा क्रमांक त्यांना दाखवता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धारित मुदतीत ऑनलाईन स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


