पणजी : गोवा विधानसभेचे एकदिवसीय हिवाळी (Goa assembly winter session) अधिवेशन १६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. राज्यपालांनी आठव्या विधानसभेचे पंधरावे अधिवेशन बोलावण्याचे समन्स जारी केले आहे.
विधानसभा बुलेटिननुसार, सभागृहाची केवळ एकच बैठक होईल आणि कामकाज पूर्ण झाल्यावर, संध्याकाळी ६ वाजता किंवा त्यापूर्वी सत्राची कार्यवाही समाप्त होईल. आमदारांना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तारांकित आणि अतारांकित प्रश्न सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त ३ तारांकित आणि १५ अतारांकित प्रश्न सादर करू शकतो. प्रश्न निवडीसाठीचे बॅलट १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होईल.
हा लोकशाहीचा अपमान : युरी आलेमाव
विधानसभेचे केवळ एकदिवसाचे अधिवेशन हा लोकशाहीचा अपमान आणि जबाबदारी टाळण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
एका दिवसाचे अधिवेशन बोलावणे म्हणजे संसदीय लोकशाहीची थट्टाच आहे. भाजप सरकारला गोव्यातील गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात रस नाही. तसेच लोकप्रतिनिधींकडून विचारल्या जाणाऱ्या कठीण प्रश्नांना सामोरे जाण्याचीही त्यांची तयारी नाही. त्याऐवजी, विधानसभेला केवळ नवीन घोषणा आणि निवडणुकीच्या उद्देशाने दिलेल्या आश्वासनांच्या प्रसिद्धीचे व्यासपीठ बनवण्याचा सरकारचा इरादा आहे.
युरी आलेमाव म्हणाले, भाजप सरकार मोठी आश्वासने देते, परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरते, हे गोव्यातील जनतेने वारंवार पाहिले आहे. गोव्यासमोर असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर केवळ एका दिवसात चर्चा होऊ शकते, असे भाजप सरकारला खरोखर वाटते का? राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महिला आणि मुलांवरील वाढते गुन्हे, बलात्काराच्या घटना, बेरोजगारी, म्हादई प्रश्न, पर्यावरणाचा ऱ्हास, कोळसा हाताळणी, वाढते सार्वजनिक कर्ज आणि शिक्षण क्षेत्रातील संकट यांसारख्या गंभीर विषयांवर एका दिवसात पुरेशी चर्चा होऊ शकते का? सरकार जाणीवपूर्वक अधिवेशनाचा कालावधी कमी करत आहे जेणेकरून त्यांच्या कारभारावर टीका होऊ नये, असे युरी आलेमाव म्हणाले.


