मडगाव : नावेली येथील वार्षिक फेस्तानिमित्त लुईस फ्रान्सिस्को गोम्स मैदानावर भरवण्यात आलेल्या जत्रेत जागेच्या मालकी हक्कावरून आणि मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन नावेली येथील रहिवासी शांथू फर्नांडिस आणि सां जुझे दि अरियाल येथील जायंट व्हील मालक कादर शेख हे दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत्रा भरलेल्या मैदानाच्या जागेवर आपला मालकी हक्क असल्याचा दावा करत शांथू फर्नांडिस यांनी मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले होते. याच वेळी जायंट व्हीलचे मालक कादर शेख यांना आपले वाहन मैदानाबाहेर काढायचे असल्याने त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन शांथू फर्नांडिस यांनी प्रथम कादर शेख यांच्या डोक्यावर पादत्राणाने प्रहार केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर तेथे उपस्थित असलेल्या जमावाने शांथू यांना बेदम मारहाण केली. तसेच, या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या एका मुलालाही जमावाने मारहाण केली. या झटापटीत शांथू फर्नांडिस आणि कादर शेख हे दोघेही जखमी झाले.
दरम्यान, या जागेच्या मालकी हक्कासंदर्भात शांथू फर्नांडिस यांनी गेल्या आठवड्यातच मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने हा वाद विकोपाला जाऊन हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या जमिनीचा वाद सध्या मामलेदारांसमोर सुनावणीसाठी प्रलंबित असून, पंचायतीकडूनही या जागेवर फेरी भरवण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही.
त्यामुळे पोलिसांनी बेकायदेशीररीत्या फेरी लावणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या कादर शेख, त्यांचा मुलगा व इतर संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शांथू फर्नांडिस यांच्या वकिलांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या दोन्ही जखमींवर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून, मडगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


