ब्रिटिश महिलेवर बलात्कार, लुटमारप्रकरणी १२ वर्षांची सक्तमजुरी

दीड लाखांचा दंड : डीएनए, बोटांच्या ठशांचे पुरावे ठरले शिक्षेसाठी निर्णायक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th November, 09:59 pm
ब्रिटिश महिलेवर बलात्कार, लुटमारप्रकरणी १२ वर्षांची सक्तमजुरी

काणकोण येथे २०१८ मध्ये एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार करून तिची रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने आरोपी रामचंद्रन चेंदायेलप्पा ऊर्फ रामचंद्रन वाय याला १२ वर्षांची सक्तमजुरी आणि एकूण दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

२० डिसेंबर २०१८ रोजी पहाटे ४.१५ ते ४.३० च्या दरम्यान काणकोण येथील चार रस्ता परिसरात, बीएसएनएल दूरध्वनी केंद्रासमोरून पीडित महिला पायी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला मागून धक्का देऊन रस्त्यालगतच्या शेतात पाडले. त्यानंतर गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्याकडील तीन बॅगा, २० हजार रुपये रोख, पासपोर्ट, बँकेचे डेबिट कार्ड आणि अन्य वैयक्तिक साहित्य लुटून तो पसार झाला होता.

घटनेनंतर पीडितेने जवळ राहणाऱ्या मैत्रिणीकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्याच दिवशी रात्री आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पीडितेचे डेबिट कार्ड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे झुडपात लपवून ठेवलेला पासपोर्टही हस्तगत करण्यात आला.

या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण २२ साक्षीदार तपासले. हैदराबाद येथील प्रयोगशाळेच्या डीएनए अहवालात पीडितेचे कपडे, नखांचे नमुने आणि वैद्यकीय नमुन्यांमधील जैविक घटक आरोपीच्या डीएनएशी जुळल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय घटनास्थळी सापडलेल्या दंतवैद्याच्या चिठ्ठीवरील बोटांचे ठसे आरोपीच्या उजव्या हाताच्या तर्जनीशी जुळले. पीडितेने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या अंगावरील जखमा आणि आरोपीच्या अंगावरील ओरखडेही महत्त्वाचे ठरले.

७ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला बलात्कार, लुटमार आणि दुखापत करणे या कलमांअंतर्गत दोषी ठरवले होते. मात्र, पुरावे नष्ट केल्याच्या कलम २०१ अंतर्गत त्याची निर्दोष मुक्तता केली होती. शिक्षा सुनावताना पहाटेच्या वेळी महामार्गावर एकट्या असलेल्या विदेशी महिलेवर करण्यात आलेला हा गुन्हा अत्यंत क्रूर असून, अशा गुन्ह्यांमुळे राज्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचतो, असे निरीक्षण नोंदवत आरोपी कोणत्याही दयेस पात्र नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खटल्यादरम्यान आरोपी न्यायालयीन कोठडीतून पळून गेल्याची आणि त्या प्रकरणात त्याला यापूर्वीच शिक्षा झाल्याची बाबही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

तिन्ही शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश

न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यासाठी १२ वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, रात्रीच्या वेळी महामार्गावर लुटमार केल्याबद्दल १२ वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर लुटमारीदरम्यान दुखापत केल्याबद्दल १० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

प्रत्येक दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. तिन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असून, २० डिसेंबर २०१८ पासून आरोपीने तुरुंगात घालवलेला कालावधी शिक्षेतून वजा केला जाणार आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीतून पलायन केलेला कालावधी त्यातून वगळण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा