गोव्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जत्रोत्सवांची पर्वणी; पाहा संपूर्ण सणांची यादी

गोव्यातील समृद्ध लोकसंस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला जत्रोत्सव-कालोत्सवाचा हंगाम सुरु होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये तुळशी विवाह, साखळीची त्रिपुरारी पौर्णिमा, ओल्ड गोवा फेस्तसह राज्यभरातील प्रमुख देवस्थानांचे प्रसिद्ध जत्रोत्सव-कालोत्सव, जागर आणि फेस्त उत्साहात व भक्तीभावाने साजरे होणार आहेत.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जत्रोत्सवांची पर्वणी; पाहा संपूर्ण सणांची यादी

पणजी : गोवा हे जरी आकाराने छोटे राज्य असले, तरी येथील सण, उत्सव आणि महोत्सवांची रेलचेल नेहमीच भुरळ घालत असते. गोमंतकातील जत्रोत्सव हे केवळ धार्मिक विधींचे पर्व नसून, ते गावागावांतील सामाजिक ऐक्य, एकोपा आणि समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत प्रतीक मानले जातात. प्रत्येक ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवाबरोबरच जत्रोत्सवाची परंपरा गोव्यात पिढ्यानपिढ्या जपली गेली असून, अनेक भागांत या उत्सवांना 'कालोत्सव' म्हणूनही संबोधले जाते. यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत गोव्याच्या कानाकोपऱ्यात विविध प्रसिद्ध देवस्थानांचे जत्रोत्सव आणि फेस्त साजरे होणार असून, भाविक आणि पर्यटकांसाठी ही मोठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.


Shree Navadurga Devasthan Madkai | Ponda


नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात भक्तिमय वातावरणाची सुरुवात होत आहे. २० नोव्हेंबर रोजी साखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचा उत्सव अर्थात 'पंढरपूर यात्रा' साजरी होईल, तर २१ नोव्हेंबर रोजी राज्यभर पारंपरिक उत्साहात तुलसी विवाह संपन्न होणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला मडगावचा प्रसिद्ध दिंडी उत्सव भाविकांचे आकर्षण ठरेल. २४ नोव्हेंबर रोजी रावणफोंड येथील श्री गणपती मुरूगण मंदिराचा वर्धापनदिन आणि साखळीची नयनरम्य त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाईल. महिन्याच्या अखेरीस २५ नोव्हेंबर रोजी मोप येथील श्री सातेरी माऊली देवस्थानचा कालोत्सव आणि २८ नोव्हेंबर रोजी कोरगाव येथील कमळेश्वर जत्रेने गावागावांत उत्सवी रंग भरला जाईल.


PHOTOS: Here is how Goans celebrated Tripurari Poornima 2025 in Sanquelim


डिसेंबर महिना गोव्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या संपूर्ण महिन्यात जत्रांची मोठी मालिकाच सुरू राहते. १ डिसेंबर रोजी मुळगाव येथील देवी केळबाईच्या कालोत्सवाने या महिन्याची सुरुवात होईल. २ डिसेंबरला मडकईची नवदुर्गा जत्रा आणि बोरीची वेतोबा जत्रा भरणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी जुने गोवे (ओल्ड गोवा) येथे जागतिक कीर्तीचा सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा फेस्त मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जाईल. ४ डिसेंबरला पाळे-शिरदोन येथे श्री सातेरी मूळसंस्थानचा एकादशी सप्तक, तर ५ डिसेंबर रोजी शिरोडा येथील श्रीदेव माऊली जत्रा आणि बाळ्ळी (केपे) येथील शांतादुर्गा बाळ्ळीकरीण कालोत्सव पार पडेल. ६ डिसेंबरला मुळगाव येथे वेताळ आणि नवदुर्गा जत्रेचा संगम पाहायला मिळेल.


The Once-in-a-Decade St. Francis Xavier Goa Feast 2024: A Spiritual and  Cultural Spectacle


पुढे ८ डिसेंबर रोजी मयडे-अस्नोडा येथील शांतादुर्गा देवालयाचा दिवजोत्सव आणि पार्से येथील देवी भगवती जत्रोत्सव संपन्न होईल. ९ डिसेंबरला आरावलीची वेतोबा जत्रा, तर ११ डिसेंबर रोजी नानोडा येथील श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थान जत्रा आणि आरावलीची सातेरी जत्रा एकाच दिवशी साजरी होईल. १२ डिसेंबरला सावईवेरेची मदनंत जत्रा, मणेरी येथे सातेरी देवी मंदिर जत्रोत्सव आणि तुये येथे भवानी जत्रा भरेल. १३ डिसेंबर रोजी थिवी येथील लक्ष्मीनारायण देवस्थानचा पालखी उत्सव आणि खोर्ली (म्हापसा) येथील श्री सातेरी देवीचा कालोत्सव रंगणार आहे. 


अनंत चतुर्दशी: शेषशायी विष्णूंचे दर्शन; ४०० वर्षांचा इतिहास, दृष्टांत झाला  अन् अनंत प्रकटला - Marathi News | anant chaturdashi 2024 sheshashayi vishnu  darshan and know about ...


१५ डिसेंबरला चांदेलचा सातेरी देवस्थान जत्रोत्सव, १६ डिसेंबरला तोरसे येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान जत्रा, तर १७ डिसेंबर रोजी कोरगावची श्री भूमिका जत्रा, माशेलची श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण जत्रा, मांद्रे येथील श्री सप्तेश्वर जत्रा आणि धारगळ येथील श्री शांतादुर्गा कालोत्सवाचा प्रारंभ होईल. १८ डिसेंबरला तांबोसे येथील श्री ब्राह्मणी देवी मंदिर जत्रा, १९ डिसेंबरला मांद्रे येथील सातेरी पंचायतन जत्रा, २१ डिसेंबरला वारखंड येथील श्री देवी माऊली शांतादुर्गा जत्रा, २५ डिसेंबरला नानोडा येथील शांतादुर्गा कांदोळकरीण देवस्थान जत्रोत्सव आणि वर्षाच्या अखेरीस ३० डिसेंबर रोजी उगवे येथील श्री देवी माऊली देवस्थान जत्रेने या सांस्कृतिक पर्वाची सांगता होईल. एकंदरीत, पुढील दीड महिना संपूर्ण गोवा ढोल-ताशांचा गजर, दशावतारी नाटके आणि भाविकांच्या अथांग उत्साहाने दुमदुमून जाणार आहे.


Photo of Shri Shantadurga Verlekarin Devasthana


गोव्यातील जत्रोत्सव : काळाच्या ओघात बदलणारे स्वरूप आणि संस्कृतीचा गोडवा

पावसाळ्यानंतर गोव्यात वेध लागतात ते हिवाळ्यात पाऊल ठेवणाऱ्या गावोगावी भरणाऱ्या जत्रांचे. उन्हाळ्यात आंबा-फणसाचा घमघमाट आणि पावसाळ्यात खळाळणारे धबधबे जसे मनाला सुखावून जातात, तसेच हिवाळ्यातील जत्रांची ऊब गोमंतकीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कदाचित म्हणूनच, शेतीची कामे आटोपून हातात पैसा खुळखुळत असताना, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या जत्रा हिवाळ्यात रांगेने मांडल्या गेल्या असाव्यात. एकेकाळी शेती, गावव्यवस्था आणि जत्रा यांचे एक घट्ट समीकरण होते, ज्यावर संपूर्ण ग्रामीण अर्थकारण आणि संस्कृती आधारलेली होती.


jatra-1_23112647074_o_volvoi_jatra_goa_ponda - Golden Goa


आज काळ बदलला आहे; शेती आणि गावकऱ्यांचे समीकरण पूर्वीसारखे राहिले नसले, तरी गोव्यातील जत्रांच्या लोकप्रियतेत मात्र कोणतीही ओहोटी लागलेली नाही. उलट, गेल्या पिढीच्या तुलनेत आजच्या जत्रांमध्ये होणारी तुफान गर्दी पाहता, या जत्रा अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे स्पष्ट होते. तुळशीविवाहाने सुरू होणारा हा जत्रोत्सवाचा हंगाम मान्सूनपूर्व पावसापर्यंत असाच बहरत राहतो. बालपणीच्या आठवणीत रमणाऱ्या मुलांसाठी रंगीबेरंगी खेळणी, खाऊ आणि मनोरंजक दुकाने हे जत्रेचे मुख्य आकर्षण असतात. वर्षभर गाभाऱ्यात असणाऱ्या देवदेवता जेव्हा पालखीतून किंवा कागदी पताकांनी सजवलेल्या बहुमजली रथातून नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडतात, तेव्हा संपूर्ण गाव धन्य होते.


Sacred Rhythms: The enchanting world of Goan jatras | Goa News - The Times  of India


जत्रेच्या मैदानात भांडी-कुंडी, घरगुती वस्तू आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने तर असतातच; परंतु काळ बदलत तशी जत्र्यांची रूपरेषाही बदलली आहे. अलीकडच्या काळात जत्र्यांच्या परिसरात जुगाराच्या टेबलांनी हजेरी लावली असून, वीस ते पंचवीस टक्के परिसर अशा जुगाराने व्यापलेला दिसतो. पूर्वी जत्रेत पारंपरिक दशावतारी किंवा लोकनाट्यांचे प्रयोग व्हायचे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या या नाटकांसोबतच जत्राही संपायची. आज वाहतुकीची साधने वाढल्यामुळे लोक देवाचे दर्शन घेऊन खासगी वाहनांनी तातडीने घरी परततात; त्यामुळे पहाटेची ती गर्दी आता कमी झाली आहे. मात्र, ही गर्दी टिकवून ठेवण्यासाठी आता जुगार आणि करमणुकीचे नवे पर्याय पुढे येत असून, गावच्या जत्रा एका नव्या रूपात लोकांसमोर येत आहेत. बदलत्या काळात रूप बदलत असले, तरी गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा हा गोडवा आजही तितकाच जिवंत आहे.


दशावतारा'च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर Maharashtra Marathi News |  Kokani artist on ghat due to the expansion of 'Dashavatara' | Latest  Maharashtra News at Lokmat.com


हेही वाचा
सर्व पहा