शोषण आणि भेदभावाविरुद्ध गोव्यात मिशनरी सिस्टर्सचा स्तुत्य सामाजिक लढा

रोजगारासाठी गोव्यात येणाऱ्या ईशान्य भारतीय तरुण-तरुणींचे शोषण होत आहे. मिशनरी सिस्टर्स ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन्स या संस्थेच्या भगिनी या पीडितांची सुटका करून पुनर्वसन करत आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
शोषण आणि भेदभावाविरुद्ध गोव्यात मिशनरी सिस्टर्सचा स्तुत्य सामाजिक लढा

पणजी : रोजगाराच्या शोधात ईशान्य भारतातील विविध राज्यांतून गोव्यात येणाऱ्या असहाय्य तरुण-तरुणींना कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, छळ आणि असुरक्षित परिस्थितीतून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य 'मिशनरी सिस्टर्स ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन्स' या संस्थेच्या सिस्टर्स करत आहेत. आपल्या विशेष 'मायग्रंट मिनिस्ट्री' अर्थात स्थलांतरित सेवा केंद्राद्वारे या सिस्टर्स पीडितांची सुटका, पुनर्वसन, कायदेशीर मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि मानसिक आधार देऊन त्यांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद देत आहेत.

गोव्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे ३० हजार ईशान्य भारतीय तरुण कार्यरत आहेत. यामध्ये कॅसिनो, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्पा आणि रिसॉर्ट्समधील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सिस्टर बिबियाना कामेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अनेक तरुण-तरुणी असुरक्षित दलाल आणि अनधिकृत नेटवर्कमार्फत गोव्यात येतात आणि त्यामुळे ते सहजपणे आर्थिक व शारीरिक शोषणाचे बळी ठरतात. वांशिक हिंसाचारात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मणिपूरमधून एप्रिल महिन्यात गोव्यात आलेली २१ वर्षीय चिंग हाओकिप याचेच एक बोलके उदाहरण आहे. सुमारे १,४६० मैलांचा प्रवास करून कळंगुट येथील एका कुटुंबात घरकाम करणाऱ्या चिंगला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले. तिला पुरेसे अन्न आणि राहण्याची योग्य सोयही नाकारण्यात आली होती. या प्रकाराची माहिती मिळताच सिस्टर कामेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिची सुटका केली. इतकेच नव्हे तर तिला नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देऊन तिचे भविष्य सुरक्षित केले.

या वाढत्या समस्यांची दखल घेत सिस्टर रोज पाईट यांनी गोव्यात 'मायग्रंट इनिशिएटिव्ह्ज फॉर नॉर्थईस्ट' हा उपक्रम सुरू केला असून, त्याला 'मिसिओ इन्स्टिट्यूट'चे पाठबळ लाभले आहे. स्थलांतराला विरोध न करता तरुण-तरुणींना सुरक्षित मार्गाने रोजगार मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सिस्टर पाईट यांनी स्पष्ट केले. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाविरुद्धही ही संस्था लढा देत आहे. मिझोरममधील जेनी या तरुणीला गर्भवती राहिल्यामुळे कॅसिनोतील नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. संस्थेने तिला आश्रय देऊन आधार दिला; आज ती याच संस्थेत 'फील्ड असिस्टंट' म्हणून काम करत इतर पीडित कामगारांना शोधून मदत करत आहे.

व्यावहारिक आणि कायदेशीर मदतीसोबतच या तरुणांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक गरजाही सिस्टर्सकडून पूर्ण केल्या जातात. ईशान्येकडील ख्रिश्चन आदिवासी समुदायातून आलेल्या या तरुण-तरुणींना आठवड्याच्या शेवटी कामाचा प्रचंड ताण असल्याने रविवारच्या प्रार्थनेला उपस्थित राहता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन 'आर्चडायोसीस ऑफ गोवा अँड दमण'च्या सहकार्याने दर गुरुवारी विशेष प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. कळंगुट येथील 'मेइफुंक' या केंद्रावर कॅथलिक, प्रेस्बिटेरियन आणि बॅप्टिस्ट पंथाचे तरुण विविध भाषांमधील प्रार्थना व गीतांच्या माध्यमातून एकत्र येतात, ज्यामुळे परराज्यात राहताना येणारे एकटेपण दूर होण्यास मोठी मदत होते. स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे रक्षण आणि सुरक्षित रोजगार व्यवस्थेची गरज या कार्यातून अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा