कोरगावात जमिनीच्या विक्रीवरून हिरोजी कुटुंबीय आक्रमक

कूळ-मुंडकारांना विश्वासात न घेता जमीन विकण्याचा घाट घातल्याचा आरोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
17th November, 11:44 pm
कोरगावात जमिनीच्या विक्रीवरून हिरोजी कुटुंबीय आक्रमक

पेडणे : कोरगाव येथील हिरोजी वाडा–देऊळवाडा परिसरात जमिनीच्या कथित परस्पर विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. अनेक पिढ्यांपासून या जमिनीवर वास्तव्य करून शेती-बागायती करणाऱ्या हिरोजी कुटुंबीयांना विश्वासात न घेता जमीन मालकाने बाहेरील व्यक्तींना जमीन विकण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या जागेत कोणताही प्रकल्प उभारू देणार नाही आणि झाडांची कत्तलही सहन करणार नाही, असा ठाम इशारा हिरोजी कुटुंबीयांनी दिला आहे.

हिरोजी वाडा–देऊळवाडा परिसरातील ही जमीन शेकडो वर्षांपासून हिरोजी कुटुंबीयांच्या पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्याशी जोडलेली आहे. या जमिनीमध्ये काजूची बागायत, शेती, स्थानिकांच्या जनावरांचे गोठे, घरे तसेच पारंपरिक स्मशानभूमीचा समावेश आहे. मात्र, सध्या या जमिनीच्या विक्रीचा आणि संभाव्य विकासकामांचा विषय पुढे आल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जमीन विक्री, रूपांतर प्रक्रियेवर आक्षेप

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये येत असताना तिचे रूपांतर कशा पद्धतीने करण्यात आले, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुळ-मुंडकारांचे हक्क, जमिनीवरील पारंपरिक वापर आणि स्थानिकांचे अस्तित्व विचारात न घेता जमिनीच्या व्यवहाराची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा आरोप हिरोजी कुटुंबीयांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात सरकारने आणि नगरनियोजन खात्याने लक्ष घालून जमीन रूपांतरासंबंधीच्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.

या जमिनीतील जनावरांचे गोठे दुरुस्त करण्यासाठी हिरोजी कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी गेले असता पोलिसांनी हरकत घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

या प्रकरणी हिरोजी कुटुंबीयांनी यापूर्वीच कोरगाव पंचायतीकडे तसेच वन खात्याकडे लेखी तक्रार दाखल करून प्रस्तावित कामांना हरकत घेतली आहे.

दरम्यान, गुणाजी हिरोजी, सुरेश हिरोजी, नामदेव हिरोजी, सागर हिरोजी, शिवानंद हिरोजी, वृषाल हिरोजी, सोपान हिरोजी, महेश हिरोजी, प्रसाद हिरोजी, एकनाथ हिरोजी आणि साहिल हिरोजी यांच्यासह हिरोजी कुटुंबीयांनी या प्रकरणी एकजूट दाखवली आहे.

ही आमच्या पूर्वजांची जमीन असून त्यांनी मोठ्या कष्टाने येथे काजूची झाडे लावली. शेती-बागायती केली आणि पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जपला. पूर्वीच्या जमीन मालकांनी कधीही आम्हाला अशा प्रकारचा त्रास दिला नव्हता. मात्र, आता परस्पर जमीन विक्री करून बाहेरील व्यक्तींमार्फत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न होत असल्याने आमच्या कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे प्रणिता हिरोजी यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा