फोंडा : कुर्टी येथील एका मंदिरात पूजा करून रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत एका जोडप्याला २२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयित महिलेला अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. दुर्गामाता ऊर्फ रुपाली पवार (वय ४६, रा. कोल्हापूर) असे या महिलेचे नाव असून, तिला कोल्हापुरातून ताब्यात घेण्यात आले. फसवणुकीची ही घटना गेल्या ऑगस्ट महिन्यात घडली होती.
फोंडा परिसरातील एका जोडप्याला या संशयित महिलेने ऑगस्ट महिन्यात गाठले होते. मंदिरात पैशांची पूजा केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे आमिष तिने दाखवले. याला भुलून जोडप्याने पूजा करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रोख २२ लाख रुपये मंदिरात ठेवून पूजेला सुरुवात करण्यात आली. पूजा पूर्ण झाल्यावर ४४ लाख रुपये मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते.
फेऱ्या मारताना काढला पळ
जोडप्याने सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्यानंतर महिलेने त्यांना मंदिराभोवती फेऱ्या मारण्यास सांगितले. ते फेऱ्या मारत असतानाच संशयित महिलेने पूजेसाठी ठेवलेले २२ लाख रुपये बॅगेत भरले आणि तेथून पळ काढला. फेऱ्या पूर्ण करून परतल्यानंतर जोडप्याला ती महिला दिसली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही.
पैशांऐवजी सापडली केवळ फुले
महिला बेपत्ता झाल्याने जोडप्याने पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या रकमेची तपासणी केली. त्यावेळी पैशांऐवजी तिथे केवळ फुलेच आढळून आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फोंडा पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली.
पोलिसांची यशस्वी कारवाई
तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत शुक्रवारी संशयित महिलेला कोल्हापुरातून ताब्यात घेतले आणि फोंड्यात आणून तिला रीतसर अटक केली. पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजशेखर रेड्डी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


