कोलवा किनाऱ्यावर तरुणीचे चाकूचा धाक दाखवून अपहरण; तिघांना अटक

कोलवा किनाऱ्यावर चाकूचा धाक दाखवून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या तिघा जणांना दक्षिण गोवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत लाइव्ह लोकेशनच्या मदतीने जेरबंद केले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
कोलवा किनाऱ्यावर तरुणीचे चाकूचा धाक दाखवून अपहरण; तिघांना अटक

मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या एका थरारक घटनेत, चाकूचा धाक दाखवून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याकडे वीस हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांना दक्षिण गोवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, वेर्णा आणि वास्को पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली आहे. संशयितांनी अपहरणादरम्यान पीडित तरुणीकडून जबरदस्तीने चार हजार रुपये ऑनलाइन उकळले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असलेली आणि सध्या गोव्यात वास्तव्य करणारी ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. त्याच वेळी सांकवाळ येथील तिघा नराधमांनी तिला चाकूचा धाक दाखवून बळप्रकाराने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी तिला कोण्सुवा कीजंक्शनजवळील एका निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्याकडे वीस हजार रुपयांची मोठी खंडणी मागितली. सुरुवातीला घाबरलेल्या तरुणीने आपल्या मोबाईलवरून चार हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात संशयितांना पाठवले. मात्र, त्यानंतरही त्यांची पैशांची मागणी सुरूच राहिल्याने तरुणीने प्रचंड प्रसंगावधान राखले आणि संशयितांच्या नकіत आपले लाइव्ह लोकेशन आपल्या नातेवाइकांना पाठवून दिले.

नातेवाइकांनी क्षणचा विलंब न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष यांनी तातडीने सूत्रे हलवत स्थानिक पोलिसांना सतर्क केले आणि कारवाईला गती दिली. वेर्णा पोलिसांच्या गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग केला. यादरम्यान संशयित दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले असले, तरी सतर्क पोलिसांनी त्यांच्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक अचूक टिपला. त्यानंतर बिर्ला आणि सांकवाळ परिसरात पोलिसांची विविध पथके कामाला लावण्यात आली. तक्रार मिळाल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांनी तिन्ही संशयितांना शिताफीने जेरबंद केले. या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा