फोंडा : कुर्टी येथील एका मंदिरात २२ लाख रुपयांची पूजा करून रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने २२ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या मुख्य संशयीत दुर्गामाता उर्फ रुपाली पवार (४६, कोल्हापूर) हिला अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले. सदर घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती.
पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजशेखर रेड्डी या प्रकरणी तपास करीत आहेत. फोंडा परिसरातील एका जोडप्याला संशयित महिलेने ऑगस्ट महिन्यात गाठले. मंदिरात पैशाची पूजा करून दुप्पट रक्कम करण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यावेळी जोडप्याला पैसे दुप्पट करण्याची इच्छा झाली. त्यांनी त्वरित संशयीताला पूजा करण्याची इच्छा दर्शविली.
त्यानुसार रोख २२ लाख रुपये मंदिरात ठेवून पूजा करण्यात सुरुवात केली. सर्व २२ लाख रुपयांची पूजा केल्यानंतर ४४ लाख रुपये मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार जोडप्याने पूजा केली. शेवटी मंदिराच्या सभोवती फेऱ्या मारण्यास सांगितले. त्यावेळी संशयीत महिलेने पूजेसाठी ठेवलेले २२ लाख रुपये बॅगेत भरून तेथून पळ काढला.
फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर जोडप्याला संशयीत महिला दिसून आली नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेतला. पण महिला दिसून आली नसल्याने पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या रक्कमेची तपासणी केली. त्यावेळी रक्कमेच्या ठिकाणी केवळ फुलेच आढळून आल्याने आपण फसल्याचे जोडप्याला समजून चुकले. त्यानंतर फोंडा पोलीस स्थानकात (Ponda Police Station) रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. शुक्रवारी संशयीत महिलेला कोल्हापूर मधून ताब्यात घेेऊन फोंडा येथे आणून रीतसर अटक करण्यात आली.


