राज्यात जनगणनेचा दुसरा टप्पा १६ नोव्हेंबरपासून

कर्मचारी, पर्यवेक्षकांची नियुक्ती : १ डिसेंबरपासून कर्मचारी देणार घरोघरी भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th November, 09:39 pm
राज्यात जनगणनेचा दुसरा टप्पा १६ नोव्हेंबरपासून

गोव्यात जनगणनेचा दुसरा टप्पा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वयंजनगणना (सेल्फ इन्युमरेशन) पार पडेल. त्यानंतर १ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत जनगणना कर्मचारी (इन्युमरेटर्स) घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. एप्रिल २०२७ पर्यंत या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध होईल, असे जनगणना संचालक चेष्टा यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जनगणनेचा पहिला टप्पा अर्थात ‘घरगणना’ (हाऊस सेन्सस) यापूर्वीच पूर्ण झाला आहे. आता प्रत्यक्ष जनगणनेचा दुसरा टप्पा ४ जानेवारी २०२७ रोजी पूर्ण होईल. ५ जानेवारी २०२७ ही संदर्भ तारीख धरून आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना स्वयंजनगणना करण्यासाठी मुदत असून, ती कशी करावी याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जनगणनेच्या सुलभतेसाठी राज्याचे एकूण २६ विभाग करण्यात आले आहेत. त्यापैकी १४ विभाग शहरी भागात, तर १२ विभाग ग्रामीण भागात आहेत. या प्रक्रियेसाठी ३,२७२ ‘इन्युमरेटर्स’, तर ५४५ पर्यवेक्षकांची (सुपरवायझर्स) नियुक्ती करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून हे सर्व कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती आणि आकडेवारी संकलित करणार आहेत.

जनगणनेमध्ये एकूण ४० प्रश्नांचा समावेश असेल. यात नाव, नाते, लिंग, जन्मतारीख, धर्म, जात, मातृभाषा, व्यवसाय, व्यवसायाचे ठिकाण, राहण्याचे ठिकाण, विवाहित किंवा अविवाहित स्थिती, मुले, मोबाईल क्रमांक आणि कोविड लसीकरण यांसारखी माहिती विचारली जाईल. या प्रत्यक्ष कामासंदर्भात इन्युमरेटर्स आणि पर्यवेक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

माहिती देणे बंधनकारक

जनगणना कायद्याच्या कलम १५ नुसार, ही माहिती केवळ जनगणनेसाठीच वापरली जाणार असून, प्रत्येक व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तसेच, याच कायद्याच्या कलम ८(२) नुसार जनगणनेसाठी माहिती देणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा