भारतीय युवा संघाकडून हिशेब चुकता

पाकिस्तानवर एका विकेटने रोमहर्षक विजय : टीम इंडिया ठरली ‘एशियन चॅम्पियन!’

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
14th November, 11:43 pm
भारतीय युवा संघाकडून हिशेब चुकता

दुबई : क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात पारंपरिक आणि अत्यंत अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या अंगावर काटा आणला. १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका विकेटने रोमहर्षक पराभव करत नवव्यांदा आशिया चषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. गतवर्षी अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत भारतीय युवा संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला. शेवटच्या षटकात विजयासाठी ३ धावांची गरज असताना, वेगवान गोलंदाज मोहित उल्वाने दणदणीत चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि मागिल आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आणि या वर्षीच्या लिग सामन्यात झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला.
दुबईत पार पडलेल्या या महामुकाबल्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानने तुफानी फलंदाजी करत १११ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०७ धावांची शतकी खेळी साकारली. त्याला साथ देत अब्दुल कादीरने अवघ्या ५४ चेंडूत ३ चौकार आणि तब्बल ८ गगनचुंबी षटकारांच्या आधारे ८० धावांची विस्फोटक खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १३५ धावांच्या भागीगुरीने पाकिस्तानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
याशिवाय, कर्णधार फरहान युसूफने ६० चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानने निर्धारित षटकांत सर्वबाद ३३७ धावांचा अजस्र डोंगर उभा केला. भारताकडून काव्य पटेलने प्रभावी गोलंदाजी करत ४ बळी टिपले, तर चिकुरुपती व्यंकटने ३ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. अर्जुन राजपूतच्या खात्यात १ विकेट जमा झाली.
प्रत्युत्तरात ३३८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात सावध पण खमक्या स्वरूपाची झाली. भारताचा स्फोटक माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आणि युवा फलंदाज आर्यवीर सेहवागने पुन्हा एकदा आपल्या खेळाची चुणूक दाखवली. डावाच्या सुरुवातीलाच ५ व्या षटकात चेंडू हातावर आदळल्याने त्याला तीव्र वेदना होत होत्या. हाताला दुखापत झालेली असतानाही त्याने मैदानात संघर्ष सुरूच ठेवला.
आर्यवीरने अप्रतिम फलंदाजी करत ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेतील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्याच अंदाजात, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या प्रसिद्ध ‘माझी बॅट बोलते’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्याने आपली बॅट उंचावून ग्लोव्ह्जने बोट दाखवत टीकाकारांना आणि उपस्थितांना शब्दांपेक्षा बॅट उत्तर देत असल्याचे दाखवून दिले. आर्यवीरने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
आर्यवीरला उत्तम साथ देत कर्णधार लक्ष्य रायचंदानीने संघाच्या डावाचे सुकाणू सांभाळले. त्याने अत्यंत दबावच्या परिस्थितीत ८० धावांची दमदार आणि संयमी खेळी साकारली. त्यानंतर विनीतने २४ धावा, तर अर्जुन राजपूतने १६ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत अन्वय द्रविडने ताबडतोब १९ धावा कुटल्या. मात्र, ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने भारतावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता.
सामना अतिशय रोमांचक वळणावर आला होता, जेव्हा भारताला विजयासाठी शेवटच्या १८ चेंडूत ३० धावांची गरज होती. क्रीजवर मनल चौहान आणि मोहित उल्वा ही जोडी होती. पण ४८ व्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात मनल चौहान ४७ धावांवर झेलबाद झाला. भारताने आपली नववी विकेट गमावली होती आणि विजयासाठी एकच विकेट शिल्लक होती.
मात्र, त्यानंतर ४९ व्या षटकात मोहित उल्वाने आक्रमक पवित्रा घेत चौकार आणि षटकार खेचत सामन्याचे चित्र पालटले. या षटकात भारताने १७ धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या ८ धावांची गरज होती. एकामागोपाठ एक एकेरी धाव काढत असताना, भारताला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. अशा अत्यंत तणावाच्या आणि थरारक क्षणी मोहित उल्वाने शानदार चौकार ठोकत भारताला एका विकेटने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मोहितने २६ चेंडूत नाबाद ४९ धावांची जिगरबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

अखेरच्या षटकातील थरार
४९.१ ला चेंडू : (स्टम्पिंगची संधी टळली): अहमद हुसेनच्या गुगलीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहित उल्वा बीट झाला, परंतु वेगाने मागे पाय घेत त्याने स्वतःला स्टम्पिंग होण्यापासून वाचवले.
४९.२ रा चेंडू : (धावसंख्या पुढे सरकली): हुसेनने वाईड चेंडू टाकला, ज्यावर मोहितने चेंडू सोडला. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने पॉईंटच्या दिशेने फटका मारून १ धाव घेतली.
४९.३ रा चेंडू : (धावबाद होण्यापासून बचाव): चिगुरुपती वेंकटने चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, ज्याची इनसाईड एज लागून चेंडू पॅडला लागला. यष्टीरक्षकाने चेंडू पकडून गोलंदाजाच्या दिशेने थ्रो केला, पण तो चुकला आणि वेंकटने डायव्ह मारून आपला बचाव केला. यादरम्यान भारताची धावसंख्या ३३३/९ झाली आणि विजयासाठी ५ धावांची गरज होती.
४९.४ था चेंडू : (महत्त्वाची धाव): मोहित उल्वाने पुढे सरसावत लाँग-ऑफच्या दिशेने चेंडू ढकलून १ धाव काढली.
४९.५ वा चेंडू : (रोमांच शिगेला): चिगुरुपती वेंकटने लॉफ्टेड शॉटचा मिसक्यू करत लाँग-ऑनच्या दिशेने १ धाव घेतली, ज्यामुळे शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची समीकरण तयार झाले.
४९.६ वा चेंडू : (विजयी चौकार): मोहित उल्वाने क्रीजवरून पुढे येत शॉर्ट ऑफ लेन्थ चेंडूवर वाइड लाँग-ऑफच्या दिशेने दणदणीत चौकार ठोकत भारताला ऐतिहासिक आणि सनसनाटी विजय मिळवून दिला!