पराग-कमलेश, सावकार-कपिल, तानाजी-धोंड जाेड्या करणार भारताचे प्रतिनिधित्व

बॅडमिंटन आशिया सीनियर चॅम्पियनशिपसाठी निवड

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
11th November, 11:34 pm
पराग-कमलेश, सावकार-कपिल, तानाजी-धोंड जाेड्या करणार भारताचे प्रतिनिधित्व

पणजी : दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या ‘बॅडमिंटन आशिया सीनियर चॅम्पियनशिप २०२६’ या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोव्याच्या तीन दुहेरी जोड्या पात्र ठरल्या आहेत. पराग चौहान - कमलेश कांजी, डॉ. संदीप सावकार - कपिल कांजी आणि तानाजी सावंत - प्रदीप धोंड या तीनही गोमंतकीय जोड्यांची या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हे खेळाडू अनुक्रमे ४५ वर्षांवरील, ५० वर्षांवरील आणि ७० वर्षांवरील या वयोगटांतील दुहेरी प्रकारात भारताचे आव्हान सांभाळणार आहेत.
या खेळाडूंची निवड मार्च महिन्यात गोव्यात पार पडलेल्या ‘योनेक्स सनराईज ४८ व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५-२६’ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. पराग चौहान आणि कमलेश कांजी या जोडीने अप्रतिम खेळ करत कांस्यपदक पटकावले. डॉ. संदीप सावकार - कपिल कांजी आणि तानाजी सावंत - प्रदीप धोंड या जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठून आशियाई स्पर्धेसाठी आवश्यक असणारा निकष पूर्ण केला. गोव्यातील या खेळाडूंच्या दैदिप्यमान यशाबद्दल गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.