पणजी : गोवा ऑलिम्पिक संघटना (जीओए) टेडी कार्दोझ आणि स्वेझियल डिसोझा या दोन धावपटूंना ६ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘२०२६ गॅलेक्सी एंटरटेनमेंट मकाऊ आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. संघटनेचे खजिनदार जयेश नाईक हेही त्यांच्यासोबत असतील. चीनमधील मकाऊच्या क्रीडा व ऑलिम्पिक समितीकडून (सीओडीएम) मिळालेल्या निमंत्रणानुसार या पथकाची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, याशिवाय वर्षअखेरीस दोन मोठे क्रीडा उपक्रम राबवण्याचे नियोजन संघटनेने केले आहे. त्यांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पेडे येथे दोन दिवसांच्या बहुक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, हॉकी, तायक्वांदो आदी खेळांचा समावेश असेल. तसेच पणजी येथे गोव्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी एक दिवसीय ऑलिम्पिक क्रीडा प्रात्यक्षिक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिक चळवळ बळकट करण्यावर भर
गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची पहिली बैठक १० नोव्हेंबर रोजी पणजी येथे झाली. या बैठकीत वार्षिक उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार ऑलिम्पिक दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडाविषयक महत्त्वाचे दिवस साजरे करण्यासह तळागाळात खेळांचा प्रसार आणि ऑलिम्पिक चळवळ बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेशी आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ शी सुसंगत करण्यासाठी गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेत आवश्यक सुधारणा करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
खेळाडूंना किटचे वितरण
मकाऊ मॅरेथॉनमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते सहभाग किटचे वितरण करण्यात आले. यावेळी सरचिटणीस संदीप हेबळे, खजिनदार जयेश नाईक आणि कार्यकारी मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.


