वाळपई : वास्को येथे एकाच रात्रीत लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून विविध भागांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी आणि सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याच मोहिमेअंतर्गत वाळपई नगरपालिका क्षेत्रात केलेल्या पाहणीत तीन महत्त्वाच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
वाळपई नगरपालिकेची मुख्य कार्यालयीन इमारत, शहरातील नवीन मार्केट आणि नगरपालिकेची जुनी कार्यालयीन इमारत या तीन ठिकाणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी अग्निशमनासाठी बसविण्यात आलेली हायड्रंट यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही इमारतीत अचानक आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन मार्केटमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर
वाळपई शहरातील जुन्या मार्केटची इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने मार्केट उभारण्यात आले आहे. या नवीन मार्केटमध्ये अनेक व्यापारी आपले व्यवसाय करीत असून दिवसभर ग्राहक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, अग्निशामक दलाच्या पाहणीदरम्यान या मार्केटमध्ये बसविण्यात आलेली हायड्रंट यंत्रणाही अकार्यक्षम असल्याचे आढळून आले. आग लागल्यास तातडीने पाण्याचा पुरवठा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हायड्रंट व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, हीच व्यवस्था कार्यरत नसल्यामुळे मार्केटमधील दुकानांचे तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांचे संरक्षण कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यापारी संकुलात एकाच वेळी अनेक दुकाने सुरू असतात. विविध प्रकारचे साहित्य, विद्युत उपकरणे आणि ज्वलनशील वस्तूंचा वापरही काही दुकानांमध्ये केला जातो. त्यामुळे एखाद्या दुकानात आग लागल्यास ती शेजारील दुकानांपर्यंत पसरण्याचा धोका असतो. अशा वेळी हायड्रंटसारखी अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवीन मार्केटमधील अग्निसुरक्षेच्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या पाहणी मोहिमेत अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, उपसंचालक आळदंडकर, वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस तसेच वाळपई नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र आर्लेकर,
मार्केट निरीक्षक आणि इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
आवश्यक उपाययोजना हाती घेण्याचे पालिकेला निर्देश
अग्निशामक दलाच्या पाहणी पथकाने वाळपई नगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. हायड्रंट यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करणे, पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करणे आणि अग्निसुरक्षेच्या इतर त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून देण्यात आला आहे.


