नवी दिल्ली : गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाजण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोग (ECI) जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. (Assembly election schedule for five states including goa to be announced in January). गोवा, उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
यासंदर्भात सूत्रांनी माहिती दिली. निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त या पाचही राज्यांचा दौरा करणार आहेत. हा दौरा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या उपनिवडणूक आयुक्त (DEC) स्तरावरील पथकांचे दौरे पूर्ण केले जाणार आहेत. नोव्हेंबर अखेर हे दौरे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमधील उपनिवडणूक आयुक्त स्तरावरील पथकांचे दौरे पूर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशात एक दौरा झाला आहे. आणखी दोन दौरे नियोजित आहेत. मात्र, गोव्यातील पथकाचा दौरा अद्याप बाकी आहे. सर्व राज्यांतील दौरे पूर्ण झाल्यानंतर संबंधित पथके आपला अहवाल निवडणूक आयुक्तांकडे सादर करतील. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्त राज्यांचा दौरा करतील.
या दौऱ्यांदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. पूर्ण निवडणूक आयोगाच्या दौऱ्यात मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली जाणार आहे.
गोवा, पंजाब, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान
पाचही राज्यांमध्ये मतदान किती टप्प्यांत घ्यायचे, याबाबत निवडणूक आयोगात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अनेक टप्प्यांत मतदान घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोव्यात निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष
मतदानाचे टप्पे, निवडणुकीच्या तारखा आणि अन्य व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याच्या जवळ घेतला जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचेही आता निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.


