विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे मंत्री उतरणार मैदानात!

१५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कार्यक्रम : ‘बूथ चलो’सह जनसंपर्क अभियान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th November, 10:43 pm
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे मंत्री उतरणार मैदानात!

सरकारच्या कामगिरीची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनमत जाणून घेण्यासाठी भाजपचे सर्व मंत्री आता राज्यभरातील विविध मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ते आपला दौरा पूर्ण करतील.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क साधण्यासाठी मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात कामांची विभागणी करण्यात आली आहे. सोमवारी रात्री भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

१५ डिसेंबरपर्यंत विशेष लक्ष्य

राज्यातील सर्व मतदान केंद्रे मजबूत करण्यावर सध्या पक्षाचा भर आहे. १५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत (बूथ) राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीची तसेच योजनांच्या अंमलबजावणीची माहिती पोहोचवण्याचे मुख्य उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.

या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, अॅड. नरेंद्र सावईकर, दत्ता खोलकर, सर्व मंत्री, आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, माजी मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि फ्रान्सिस सिल्वेरा यांचाही समावेश होता.

सरकार तुमच्या दारीनंतर ‘बूथ चलो अभियान’

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यापूर्वी ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. आता ‘बूथ चलो अभियाना’च्या माध्यमातून मंत्री थेट मतदारसंघांना भेट देतील. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साथीने ते मतदारांशी संपर्क साधून सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर दिली.

भाजपचे ३० आमदार निवडून येतील
  1. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने एक रोडमॅप तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
  2. सरकारची कामगिरी आणि कल्याणकारी योजनांमुळे आगामी निवडणुकीत भाजपचे ३० आमदार निश्चित निवडून येतील, असा विश्वास जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला.
  3. निवडणुका जवळ आल्याने पक्षातर्फे आता विविध स्तरांवर नियमित बैठकांचे सत्र सुरू राहील, असेही सांगण्यात आले.
कोमुनिदाद जमिनीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

कोमुनिदादच्या जमिनींवर बेकायदेशीररीत्या कुळांची नावे नोंदवण्यात आली आहेत, ती हटवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, म्हापसा येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण अतिशय हीन आणि संतापजनक कृत्य असून अशा घटना घडायला नकोत, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा
सर्व पहा