पणजी : सरकारी सेवेतून निवृत्ती घेतलेले गोवा नागरी सेवेतील अधिकारी, राजीनामा दिलेले संयुक्त सचिव, निवृत्त अभियंते आणि सरकारी इस्पितळातील निवृत्त डॉक्टर असे अनेकजण आगामी विधानसभा निवडणुकीत आपले भवितव्य आजमावणार आहेत. नोकरीला रामराम ठोकून थेट राजकीय मैदानात उतरण्याची तयारी या माजी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
उत्तम पार्सेकर, संकेत आर्सेकर आणि मयुर सावकार हे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, गुरुदास पिळर्णकर यांनी राजकीय पक्षांशी बोलणी केली होती; मात्र आता ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने आपण अपक्ष उमेदवार म्हणून जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी नोकरी सोडून निवडणूक लढवली होती आणि ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गोमेकॉच्या सेवेत असलेले डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी २००० च्या दरम्यान नोकरी सोडली. बऱ्याच वर्षांनंतर ते राजकारणात आले आणि डिचोलीचे आमदार झाले. एकेकाळी पोलीस सेवेत असलेले जीत आरोलकर यांनीही नोकरी सोडली व त्यानंतर काही वर्षांनी राजकारणात येऊन ते आमदार झाले.
काही वर्षांपूर्वी नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी एल्वीस गोम्स यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून राजकारणात उडी घेतली, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या उदाहरणांवरून २०२७ च्या निवडणुकीतही काही माजी अधिकारी, अभियंते आणि निवृत्त डॉक्टर राजकारणात आपले भवितव्य आजमावण्यासाठी तयारीला लागले आहेत.
सांताक्रूझ मतदारसंघातून गुरुदास पिळर्णकर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. पिळर्णकर यांनी राज्य नागरी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कला संस्कृती खाते, पालिका प्रशासन संचालक अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते.
पेडणे मतदारसंघातून उत्तम पार्सेकर आणि डॉ. संजय कोरगावकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उत्तम पार्सेकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता होते. त्यांना सेवेत मुदतवाढही दिली होती. ती मुदत संपल्यानंतर आता ते राजकारणात उतरले आहेत.
गोमेकॉच्या सेवेत असलेले डॉ. संजय कोरगावकर हेदेखील पेडणे मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्याच्या हेतूने सध्या समाजकार्यात सक्रिय आहेत.
मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव असलेले संकेत आर्सेकर हे खासगी अधिकारी असले तरी त्यांची नियुक्ती सरकारने केली होती. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते सावर्डे मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
तर, कस्टम विभागातील माजी अधिकारी असलेले मयुर सावकार हे सध्या राजकारणात उतरण्याच्या हेतूने म्हापसा येथे काम करत आहेत. निवृत्तीनंतर ते समाजकार्यात आले असून आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.


