कुशावती जिल्ह्यातील पाळोळे ठरला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा, जगात सहावा क्रमांक

कुशावती जिल्ह्यातील काणकोण येथील प्रसिद्ध पाळोळे समुद्रकिनाऱ्याला 'बीच डॉट कॉम'च्या जागतिक निर्देशांकात आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून घोषित करण्यात आले असून, जागतिक क्रमवारीत सहावे स्थान मिळाले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
कुशावती जिल्ह्यातील पाळोळे ठरला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा, जगात सहावा क्रमांक

पणजी: गोव्याच्या निसर्गरम्य किनारपट्टीने आणि समृद्ध निसर्गसौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपले स्थान अधोरेखित केले आहे. कुशावती जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील प्रसिद्ध जगप्रसिद्ध पाळोळे समुद्रकिनाऱ्याला 'बीच डॉट कॉम'च्या 'ग्लोबल बीच इंडेक्स २०२६' मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून गौरवण्यात आले आहे. केवळ आशियातच नव्हे, तर जगभरातील पहिल्या २५ सर्वोत्तम किनाऱ्यांच्या यादीत पाळोळेने सहावा क्रमांक पटकावला असून, या मानाच्या जागतिक यादीत स्थान मिळवणारा हा आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. गोव्याच्या पर्यटन खात्याने रविवारी या ऐतिहासिक यशाची अधिकृत घोषणा केली.


This Beautiful Beach Was Named the Best in Asia for 2026—With White Sand,  Clear Water, and Dolphin Sightings - Yahoo Life Singapore


अर्धचंद्राकृती खाडी, स्वच्छ पांढरी वाळू, उंचच उंच नारळीच्या बागा आणि शांत समुद्र हे पाळोळे किनाऱ्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. या जागतिक क्रमवारीसाठी 'बीच डॉट कॉम'ने तज्ज्ञांची मते, जगभरातील पर्यटकांच्या प्रतिक्रिया, पाण्याच्या स्वच्छतेचा 'नासा'चा उपग्रह डेटा आणि जागतिक लोकप्रियतेपासून ते हवामानापर्यंतच्या तब्बल १८ निकषांचा कसून अभ्यास केला होता. या सर्व चाचण्यांवर पाळोळे किनाऱ्याने आपली मोहक मोहिनी सिद्ध केली आहे.


Things to Do in South Goa: Beaches, Attractions & Activities


या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, हे यश म्हणजे गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि पर्यटकांना मिळणाऱ्या अनोख्या अनुभवाची जागतिक पावती आहे. राज्य सरकार आता केवळ पर्यटकांच्या संख्येवर भर न देता पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांचे जतन करणाऱ्या 'पुनरुज्जीवन आणि जबाबदार पर्यटनाला' प्राधान्य देत आहे. तर पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या मते, या यशामुळे दक्षिण गोव्यातील इतर पर्यटनस्थळे, अंतर्गत भागांतील निसर्ग पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत होणार आहे.


PALOLEM BEACH - All You SHOULD Know Before Going 2026 (with Photos) -  Tripadvisor


पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरू होताच पाळोळे किनारपट्टीवर रंगीबेरंगी बांबूचे क्वार्टर्स आणि खाद्यपदार्थांच्या शॅक्सचे अनोखे दृश्य पाहायला मिळते. येथे कायम उत्तर युरोपीयन देशांतील पर्यटकांची रेलचेल असते. कायकिंग, डॉल्फिन दर्शन, शांत संगीताची 'सायलेंट नाईट डान्स पार्टी', योगा केंद्र आणि जवळच असलेले खोतीगाव वन्यजीव अभयारण्य यामुळे पाळोळे तरुणाई आणि परदेशी पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले आहे. गोव्यात वर्षभर पर्यटन उपक्रमांना चालना देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.


Canacona Travel Guide: Best Places to Visit

हेही वाचा
सर्व पहा