मडगाव रेल्वे स्थानकावर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
34 mins ago
मडगाव रेल्वे स्थानकावर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा

मडगाव : मडगाव रेल्वेस्थानक परिसरातील बेन्जो कॅन्टीनसमोर टेम्पोने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या शंकर काळे (मूळ रा. सोलापूर, महाराष्ट्र) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी टेम्पोचालक आनंद कुमार (रा. दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

    ही घटना ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. संशयित चालक आपला फोर्स टेम्पो रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून बाहेर जाणाऱ्या मार्गावरून भरधाव वेगाने नेत असताना बेन्जो कॅन्टीनसमोरील वळणावर बाजूला बसलेल्या शंकर काळे यांना त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात काळे यांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली.

    अपघातानंतर चालकाने जखमीला रुग्णालयात दाखल केले नाही किंवा पोलिसांना माहितीही दिली नाही. त्यामुळे काळे हे गंभीर जखमी अवस्थेत दुपारी ३ वाजेपर्यंत घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित चालक आनंद कुमार याच्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम गावकर करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा