नरकासुर पाहायला जाताय? वाहतुकीचे नियम मोडाल तर थेट कारवाई!

वाहतूक पोलिसांचा इशारा; मद्याच्या धुंदीत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई; दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यात विविध ठिकाणी नरकासुर प्रतिमा स्पर्धा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोवा वाहतूक पोलिसांनी (Goa Traffice Police) विशेष वाहतूक सूचना जारी केल्या आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
नरकासुर पाहायला जाताय? वाहतुकीचे नियम मोडाल तर थेट कारवाई!

पणजी : दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यात विविध ठिकाणी नरकासुर प्रतिमा स्पर्धा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोवा वाहतूक पोलिसांनी (Goa Traffice Police) विशेष वाहतूक सूचना जारी केल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नरकासुर पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत किंवा विनाकारण थांबवू नयेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन इतर वाहनचालकांची गैरसोय होऊ शकते. वाहनचालकांनी केवळ निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक

दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असून, दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नयेत. तसेच मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेषतः मद्यपान करून वाहन चालवताना आढळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

सणाचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेची जबाबदारीही पाळा!

दिवाळीचा उत्सव साजरा करताना स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू नका. वाहतुकीला सहकार्य करून सुरक्षित आणि विनाअडथळा दिवाळी साजरी करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा