मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पचमढी येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागपूरमधील एका शिक्षकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी घडली. विजय नाईक (वय ४०, रा. खानखोजे नगर, नागपूर) असे मृत शिक्षकाचे नाव असून ते नागपुरातील रामदासपेठ येथील सोमलवार शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
विजय नाईक हे अत्यंत अभ्यासू, सदैव हसतमुख आणि इतरांना मदत करणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांना ॲडव्हेंचरची आवड होती. शाळेत एनसीसी विभागाची जबाबदारी असल्याने ते इतर काही शिक्षक, विद्यार्थी आणि आपले वडील हरिदास नाईक यांच्यासोबत पचमढी येथे पर्यटनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री नागपूर येथून बसने निघालेले हे सर्वजण शुक्रवारी पहाटे पचमढी येथे सुरक्षित पोहोचले होते.
शुक्रवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास हे सर्वजण पचमढीच्या प्रसिद्ध सनराईज पॉईंटवर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका माकडाने ग्रुपसोबत असलेल्या एका शिक्षिकेची बॅग हिसकावली. विजय नाईक यांनी प्रसंगावधान राखून ती बॅग माकडाच्या तावडीतून सोडवून शिक्षिकेला परत मिळवून दिली. मात्र, बॅग हाती आल्यानंतर अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते थेट खोल दरीत कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विजय नाईक हे मूळचे वर्ध्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील सुसुंद्रा गावचे रहिवासी होते. ते नागपुरात त्यांची पत्नी अर्चना नाईक आणि दोन लहान मुलींसह राहत होते. दिवाळीच्या अगदी तोंडावर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आणि आधारस्तंभाचा असा अचानक मृत्यू झाल्याने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या परिसरात आणि शिक्षण क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले असून शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


