लखनौ : नौबस्ता भागातील ब्राह्मणी टोला येथे कार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून घडलेल्या एका हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत ५० वर्षांचे जुने संबंध आणि उपकार विसरून एका कृतघ्न शेजाऱ्याने आपल्याच आश्रयदात्या कुटुंबातील तिघांचे प्राण घेतल्याचे समोर आले आहे. शिवाजी तिवारी, शिवेंदु तिवारी आणि सुयश तिवारी अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जवळपास ५० वर्षांपूर्वी शिवाजी तिवारी यांचे वडील चंद्रभान तिवारी यांनी आरोपी कुटुंबाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. इतकेच नव्हे तर, कुटुंबातील मुख्य व्यक्ती डीके शुक्ला यांना हरदोईच्या कॉटन मिलमध्ये नोकरी मिळवून देण्यातही तिवारी कुटुंबाने मोलाची मदत केली होती. या कुटुंबाला तब्बल १० वर्षे विनाभाडे आपल्या घरात आश्रय दिला होता, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध अत्यंत घनिष्ठ होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सर्व काही बदलले.
२६ ऑक्टोबर रोजी सकाळी कार पार्किंगवरून ऋषभ शुक्ला आणि शेजारी राहणाऱ्या तिवारी कुटुंबात वाद झाला. हा वाद पाहता पाहता इतक्या विकोपाला गेला की, आरोपी ऋषभ शुक्ला याने बंदूक काढून शेजारी राहणारे शिवेंदु तिवारी, त्यांचे भाऊ शिवाजी तिवारी आणि पुतण्या सुयश तिवारी यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, तरुणाईसह सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित ऋषभ शुक्लासह राजेश शुक्ला, गिरीश शुक्ला, दिनेश शुक्ला, मुन्ना बाबू, दिव्या, प्रिया आणि आदिती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित कुटुंबीयांनी आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची आणि त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, घटनेनंतर फरार असलेल्या काही संशयितांच्या शोधासाठी पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके कसून शोध मोहीम राबवत आहेत.


