मुंबई : युकेत शिक्षण घेतल्यानंतर भारतात येऊन नीम करोली बाबा यांच्या जीवनावरील ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh) या चित्रपटाच्या निर्मितीत (सहनिर्माती) वाटा उचलून अनुप्रिया नागर (Anupriya Nagar) ही युवती सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. अवघ्या २१ व्या वर्षी अनुप्रिया आज या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेल्या नफ्यातून सध्या ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मालकीण बनणार आहे. या चित्रपटाने तिला नाव, पैसा, प्रसिद्धी सर्व काही दिले. आजच्या तरुणाईला प्रेरणादायक ठरणारे असेच तिचे यश आहे. जीवनात काही तरी भव्यदिव्य करायचे असे ध्येय ठरवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते हे अनुप्रियाने सिद्ध करून दाखवले आहे.
सध्या १०० दिवस पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या या चित्रपटाने जगभरात ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त तर भारतात ३४१.७१ कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. अवघ्या दीड कोटी रुपयांत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात अनुप्रियाचा वाटा ५० लाख रुपये एवढा आहे. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत अनुप्रियाने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
युकेत अनुप्रिया शिक्षण घेत होती. त्यानंतर टेक कंपन्यांच्या संस्थापकांना त्यांच्या कल्पनेची प्रेरणा कुठून मिळाली यावर संशोधन करताना तिला ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) आणि नीम करोली बाबा यांच्यातील कनेक्शनबद्दल माहिती मिळाली. आणि ती बाबांच्या विचारांनी प्रेरित झाली. त्यानंर ब्रिटनमध्ये पार्ट-टाईम काम करून साठवलेली रक्कम चित्रपट निर्मितीत लावली. ‘हनुमान अंश’ चित्रपट तुफान चालू लागल्यावर अनुप्रिया रातोरात स्टार निर्माती बनली.
नफ्यातील २५ टक्के हिस्सा मिळणार
अनुप्रियाने मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाचे एकूण बजेट १.५ कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त होते. यामध्ये तिने सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम चित्रपटाच्या एकूण बजेटच्या जवळपास एक तृतीयांश होती. चित्रपटाच्या कमाईच्या वाटपासंदर्भात सांगितले की, सर्वप्रथम वितरक त्यांचा हिस्सा घेतील. त्यानंतर कर आणि इतर खर्चाची भरपाई केली जाणार आहे. त्यानंतर उरलेला नफा चार भागीदारांमध्ये (तीन निर्माते आणि दिग्दर्शक) विभागला जाणार आहे. नियमानुसार मला नफ्यातील एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के हिस्सा मिळणार आहे. सुमारे ५० कोटी रुपये तरी आपल्याला मिळतील असे वाटत असल्याचे अनुप्रियाने सांगितले.
नफ्यातील रक्कम समाजकार्यासाठी वापरणार
या क्षेत्रासंदर्भात तसे अनभिज्ञ आहे. जास्त काही माहिती नाही. नफा कमावण्यासाठी हा चित्रपट केला नव्हता. नफ्यातील रक्कम समाज कार्यासाठी वापरण्याची आपली इच्छा असल्यचेही अनुप्रियाने सांगितले.


