ग्रेटर नोएडा : शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या बचतीवर आणि जमिनीच्या मोबदल्यातून मिळालेल्या पैशांवर डल्ला पडल्याचा धक्कादायक प्रकार ग्रेटर नोएडातील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) अॅचर शाखेत उघडकीस आला आहे. बचत खाती आणि मुदत ठेवींमधून (एफडी) परवानगीशिवाय ३५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केल्याचा आरोप फसवणुकीची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणानंतर शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (PNB Greater Noida branch customers allege ₹35 crore fraud, all employees suspended) तपासासाठी सीबीआयची (CBI) मदत घेण्यात आली आहे.
बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांना त्यांच्या खात्यांमध्ये अपेक्षित रक्कम नसल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेबाहेर आंदोलन केले. बुधवारी तक्रारदारांची संख्या वाढून २५ झाली.
अॅचर येथील अमरपाल यांनी आई सुनीता देवी यांच्या नावावर अनुक्रमे ४० लाख, ३० लाख आणि १० लाख रुपयांच्या तीन मुदत ठेवी केल्या होत्या. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी आईच्या बचत खात्यात सुमारे १२ लाख रुपयेही जमा केले होते.
मात्र, १० लाखांची मुदत ठेवीचे पैसे काढण्यासाठी गेले असता खात्यात रक्कम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुदत ठेवी १६ जून रोजी मुदतपूर्व बंद करून पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आले.
दुसरे खातेदार संदीप यांच्या कुटुंबाला जमिनीच्या मोबदल्यातून मिळालेले १.२८ कोटी रुपये बँकेत जमा केले होते. मात्र, ५० हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या त्यांच्या भावाला खात्यात केवळ १५ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक राम विनोद कुमार यांनी हस्तांतरित झालेली रक्कम पीएनबीच्या दिल्ली मुख्यालयाने रोखून धरल्याचे आणि ती परत केली जाईल, असे सांगितले. बँकेकडून अंतर्गत चौकशीही सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडूनही तपास सुरू असल्याची माहिती ग्रेटर नोएडाचे सहायक पोलीस आयुक्त संचित शर्मा यांनी दिली.


