सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे (ता. कुडाळ) येथे रविवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या दुर्घटनेत डंपर (एमएच ०७ सी ६१९८) पूर्णपणे जळून खाक झाला आहे. चालक वासुदेव भगवान तळवणेकर यांनी प्रसंगावधान राखून डंपरमधून उडी घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
प्राप्त माहितीनुसार, सावंतवाडी-मळेवाड येथील रहिवासी असलेले चालक वासुदेव तळवणेकर हे डंपर घेऊन चिरे वाहतूक करण्यासाठी कसालच्या दिशेने जात होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी झाराप येथील पेट्रोल पंपावर डंपरमध्ये इंधन भरले. त्यानंतर डंपर बिबवणे येथे पोहोचला असता अचानक डंपरचा जॉइंट तुटला.
जॉइंट तुटल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ गाडीवर नियंत्रण मिळवून ती सुरक्षित बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच डंपरने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. त्या आधी तळवणेकर यांनी डंपरमधून उडी मारून स्वत:चा जीव वाचवला.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंंडी
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक दल आणि कुडाळ एम.आय.डी.सी. अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत डंपर पूर्णतः जळून खाक झाला होता. या अचानक घडलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.


