‘मगोप’कडून उमेदवारांची चाचपणी सुरू

विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होणार असल्याचे मगोपचे नेते सांगत असले, तरी सध्या पक्षाचा पूर्ण भर उमेदवार निश्चित करण्यावर असल्याचे समजते. मगोप हा स्वतंत्र पक्ष असून प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सध्या उमेदवारांची चाचपणी आणि सर्वेक्षण सुरू असून, पक्ष किमान १२ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करू शकतो, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे.


7 mins ago
‘मगोप’कडून उमेदवारांची चाचपणी सुरू

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) युती होणार असल्याचे मगोपचे (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) नेते सांगत असले, तरी सध्या पक्षाचा पूर्ण भर उमेदवार निश्चित करण्यावर असल्याचे समजते. मगोप हा स्वतंत्र पक्ष असून प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सध्या उमेदवारांची चाचपणी आणि सर्वेक्षण सुरू असून, पक्ष किमान १२ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करू शकतो, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे.
मगोपकडून सध्या काही प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे, ज्यात मडकई मतदारसंघातून मिथील ढवळीकर, फोंडा येथून सुदिन ढवळीकर, शिरोडा येथून दीपक ढवळीकर आणि मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकर यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय प्रियोळ, डिचोली, पेडणे आणि म्हापसा येथेही पक्षाची स्थिती मजबूत आहे. पक्षाची ३१ ऑक्टोबर रोजी आमसभा आणि त्यानंतर कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर निवडणूक तयारीला खऱ्या अर्थाने वेग येईल. १२ मतदारसंघांत निवडणूक लढवणे पक्षासाठी सहज शक्य असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता असून अद्याप बराच वेळ आहे. त्यामुळे घाईगडबड करण्याची गरज नाही. जे कार्यकर्ते चांगले काम करत आहेत, त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे. याच धर्तीवर मडकई मतदारसंघातून मिथील ढवळीकर यांच्या नावाचा विचार केला जाईल. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझा संपूर्ण गोव्यात संपर्क व काम सुरूच आहे, असे दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
भाजपसोबतची युती कायम राहील
मगोप आणि भाजप यांच्यात सध्या युती असून आगामी निवडणुकीतही युती कायम राहील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. ३१ ऑक्टोबरच्या आमसभेनंतर मगोपच्या नेत्यांची भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत अधिकृत चर्चा होणार असून, त्यानंतरच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वी मगोपची अंतर्गत निवडणूक तयारी सुरू राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा