शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पर्वरीतील वृद्धाची ३९ लाखांची फसवणूक; पुण्यातून दोन सायबर ठगांना अटक

गोवा सायबर पोलिसांनी ऑनलाइन शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली पर्वरी येथील एका वृद्धाची ३९ लाखांची फसवणूक करणाऱ्या पुण्याच्या दोन सायबर ठगांना अटक केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
8 mins ago
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पर्वरीतील वृद्धाची ३९ लाखांची फसवणूक; पुण्यातून दोन सायबर ठगांना अटक

पणजी : ऑनलाइन शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली एका वृद्धाची ३९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या पथकाने राबवलेल्या आंतरराज्यीय मोहिमेच्या आधारे पुणे, महाराष्ट्र येथून दोन संशयितांना यशस्वीपणे अटक केली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान पीडित व्यक्तीचे २३,१२,000 रुपये यशस्वीरित्या परत मिळवले आहेत. पोलिसांच्या पथकाने सागर प्रकाश ढोलवी याला नारायणगाव, पुणे येथून आणि अजिंक्य रवींद्र अभंग याला आळेफाटा, पुणे येथून जेरबंद केले. 

सायबर क्राईम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पर्वरी येथील एका ६० वर्षीय नागरिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अज्ञात फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सॲपवर विविध मोबाईल क्रमांकांद्वारे संपर्क साधला आणि त्यांना 'A83 DI Wealth Growth Centre' नावाच्या एका बनावट गुंतवणूक ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केले. ऑनलाइन शेअर गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे मोठे आमिष दाखवून आरोपींनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या भूलथापांना बळी पडून तक्रारदाराने संशयितांनी पुरवलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३९ लाख रुपयांहून अधिक रक्कम वर्ग केली.

फसवणूक करणाऱ्यांनी विश्वास बसवण्यासाठी एका बनावट इन्व्हेस्टमेंट ॲपवर काल्पनिक नफा देखील दाखवला. मात्र, जेव्हा तक्रारदाराने आपली गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी आणखी गुंतवणुकीची मागणी केली आणि त्यानंतर प्रतिसाद देणे पूर्णपणे बंद केले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

सायबर क्राईमच्या पथकाने आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. बँक खात्यांचे ट्रेल आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे सूक्ष्म विश्लेषण केल्यानंतर या तपासात उघड झाले की, संशयित अजिंक्य रवींद्र अभंग याच्या कोटक महिंद्रा बँक खात्यात १०,८०,००० रुपये आणि आरोपी सागर प्रकाश ढोलवी याच्या बँक ऑफ इंडिया खात्यात १२,००,००० रुपये वर्ग करण्यात आले होते. आर्थिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी हे दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील पुणे भागात असल्याचे शोधून काढले.

या माहितीच्या आधारे गोवा सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकाने महाराष्ट्रात धडक दिली. पथकाने सागर प्रकाश ढोलवी याला नारायणगाव, पुणे येथून आणि अजिंक्य रवींद्र अभंग याला आळेफाटा, पुणे येथून जेरबंद केले. या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे सायबर फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. ही कारवाई सायबर क्राइमचे अधीक्षक जिवबा दळवी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षक चंद्रकांत गावस यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हेड कॉन्स्टेबल अनय नाईक आणि कॉन्स्टेबल भालचंद्र नाईक यांच्या पथकाने पार पाडली.

हेही वाचा
सर्व पहा