पेडणे : मांद्रे येथील आस्कावाडा परिसरातील खर्बेवाडा येथे गुरुवारी रात्री दोन बिबट्यांनी एका पाळीव कुत्र्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. घरमालक मनोज गडेकर हे प्रसंगावधान राखून वेळीच घराबाहेर आल्यामुळे दोन्ही बिबट्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला असला, तरी सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास मनोज गडेकर यांच्या घराजवळ दोन बिबट्यांनी अचानक प्रवेश केला आणि तेथील पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवला. कुत्र्याचा आवाज ऐकून मनोज गडेकर तत्काळ घराबाहेर आले. त्यांना समोर पाहताच दोन्ही बिबटे तेथून पळून गेले, ज्यामुळे कुत्र्याची बिबट्यांच्या तावडीतून सुटका झाली. मात्र, बिबट्यांच्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे.
रहिवासी वस्तीतील घराजवळच एकाच वेळी दोन बिबट्यांचा वावर दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन खात्याकडे कारवाईची मागणी
वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने वन खात्याने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, परिसरातील बिबट्यांच्या हालचालींची पाहणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ते मार्गदर्शन व उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.


