चुलत्याचे १५ तोळे सोन्याचे दागिने विकून पुतण्याने खरेदी केली थार

पन्हाळ्यात चुलत्याचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरून त्या पैशातून थार गाडी खरेदी करणाऱ्या पुतण्याला आणि सोनाराला कोडोली पोलिसांनी अटक केली असून पूजेच्या निमंत्रणामुळे हा पर्दाफाश झाला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
चुलत्याचे १५ तोळे सोन्याचे दागिने विकून पुतण्याने खरेदी केली थार

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात घडलेली एक अजब आणि चक्रावून टाकणारी घटना सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. १९ वर्षीय पुतण्याने आपल्याच चुलत्याच्या घरातील सोन्याचे दागिने लांबवून त्या पैशातून थेट महागडी 'महिंद्रा थार' कार खरेदी केली आणि विशेष म्हणजे, त्याच कारच्या पूजेसाठी ज्यांच्या घरी चोरी केली होती, त्याच चुलत्याला मोठ्या आदराने बोलावले होते. मात्र, या अतिशहाणपणामुळेच त्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे समर पोपट चव्हाण हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्याच्या घराशेजारीच त्याचे चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे निवासस्थान आहे. साधारण महिन्याभरापूर्वी समरने संधी साधून चुलते उमेश यांच्या घरातील कपाटातून तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. हे सर्व दागिने त्याने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे याच्याशी संगनमत करून अवघ्या दहा लाख रुपयांना विकून टाकले. या पैशांचा वापर त्याने कोणतीही वेळ न घालवता थेट महिंद्रा कंपनीची 'थार' कार खरेदी करण्यासाठी केला.

नुकतीच खरेदी केलेली गाडी घरी आल्यानंतर तिच्या रीतसर पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आनंदाच्या प्रसंगी पुतण्याने शेजारीच राहणारे चुलते उमेश चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठ्या आदराने निमंत्रण दिले. पुतण्याने नवीन गाडी घेतली याचा आनंद चुलत्याच्या कुटुंबालाही होता. मात्र, पूजेला जाण्याच्या तयारीसाठी उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने अंगावर घालण्यासाठी कपाटात ठेवलेले दागिने शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा खरी उलथापालथ सुरू झाली. ज्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते, तो डबाच जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटात बाजूलाच ठेवलेले आजीचे इतर दागिने सुरक्षित होते, मात्र केवळ उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच दागिने गायब झाल्याने हा डल्ला घरातील किंवा जवळच्या परिचिताने मारल्याचा दाट संशय त्यांना आला.

याप्रकरणी चुलत्याने तात्काळ कोडोली पोलीस ठाण्यात १५ तोळे दागिने चोरीला गेल्याची रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गावानुसार आणि परिसरातील हालचालींची माहिती गोळा करताना पोलिसांच्या ध्यानात एक महत्त्वाची बाब आली. १९ वर्षीय समर चव्हाण याच्याकडे कोणतीही मोठी कमाई किंवा व्यवसायाचे साधन नसताना अचानक १० लाखांची नवीन कोरी 'थार' कार आली कशी, या प्रश्नाने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संशयित समरला ताब्यात घेत खाकीचा खाक्या दाखवताच त्याने पोपटासारખા सर्व सत्य बोलून दाखवले. चुलत्याच्या घरातून दागिने चोरून ते सोनार संग्राम मोरेला विकल्याची कबुली त्याने दिली.

या प्रकरणात कोडोली पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी पुतण्या समर चव्हाण आणि चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. एका थार गाडीच्या प्रेमापोटी आणि अंगावरील मोहामुळे तरुणाने स्वतःचे भविष्य कसे अंधारात ढकलले, याची चर्चा आता ग्रामीण भागात रंगली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा