गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून शिरदोन येथील ज्येष्ठ नागरिकाची २ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गोवा पोलिसाच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) ब्रिजेश गोवेकर (दिवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित फरार असून ईओसीचे पथक त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शिरदोन येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित ब्रिजेश गोवेकर याने १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान ‘ग्रो’ या ट्रेडिंग कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवले. वरील कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा मोबदला दिला जाईल, असे आमिष दाखवले. तक्रारदाराने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ९० लाख रुपये संशयिताने सांगितल्या बँक खात्यात जमा केले. तसेच त्याला १० लाख रुपयांची रोख रक्कम दिली. याशिवाय १.३० कोटी रुपये किमतीचे दागिने तक्रारदाराने संशयिताला दिले. याच दरम्यान संशयिताने तक्रारदाराला १७ मे २०२५ रोजी एसबीआय शिल्लक प्रमाणपत्र (बॅलन्स सर्टिफिकेट) दिले. संशयिताने वरील प्रमाणपत्राद्वारे तक्रारदाराने केलेल्या गुंतवणुकीत त्याला मोठा मोबदला मिळाल्याचे दाखवले. त्यानंतर तक्रारदाराने सदर रक्कम काढण्यासाठी संशयिताकडे चौकशी केली असता, त्याने नकार दिला. त्यावर तक्रारदाराला शंका आली. त्यामुळे त्याने चौकशी केली. त्यात एसबीआयचे प्रमाणपत्र बनावट आणि फेरफार करून तयार केल्याचे समोर आले.
ईओसीकडून संशयिताचा शोध सुरू
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार वृद्धाने या प्रकरणी ईओसीकडे धाव घेतली आणि संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नवीन देसाई यांनी संशयित ब्रिजेश गोवेकर याच्याविरोधात भा. न्या. संं.च्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच दरम्यान संशयित गोवेकर फरार झाल्याचे समोर आले. ईओसीचे पथक संशयित ब्रिजेश गोवेकर याचा शोध घेत आहे.


