फोंडा मतदारसंघ सोडण्यास सुदिन ढवळीकरांचा नकार!

मगो कार्यकारिणी आणि आमसभेत निर्णय झाल्यानंतरच भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी युतीबाबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
24 mins ago
फोंडा मतदारसंघ सोडण्यास सुदिन ढवळीकरांचा नकार!

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) जागावाटप तसेच इतर धोरणात्मक विषयांवर सर्वप्रथम पक्षाची कार्यकारिणी व आमसभेत निर्णय घेईल. आमसभेत अंतिम निर्णय झाल्यानंतरच दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांबरोबर युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, असे वीजमंत्री व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तीने मडकई मतदारसंघात काँग्रेसतर्फे माझ्या विरोधात निवडणूक लढवली आहे, त्याच्यासाठी मी फोंडा मतदारसंघ का सोडावा, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फोंड्यातून स्वतः निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मगो पक्षाने मडकई, प्रियोळ, फोंडा, शिरोडा, डिचोली, मांद्रे आणि पेडणे या सात महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपला दावा ठोकला आहे. मांद्रे, फोंडा, शिरोडा आणि मडकईसह अन्य मतदारसंघांमध्ये मगोचे अधिकृत उमेदवार निश्चितपणे रिंगणात असतील. सध्या भाजपसोबत मगोची युती असून आगामी निवडणुकीतही ती कायम ठेवण्यास मगो इच्छुक आहे. यासंदर्भात १९८४ सालापासून पक्षात सक्रिय असलेल्या ढवळीकर यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. वीस वर्षांहून अधिक काळ कार्य करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून वारंवार पक्ष बदलणाऱ्यांना उमेदवारी द्यायची का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मगोसोबत युती होण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीविषयी बोलताना ढवळीकर म्हणाले की, त्या बैठकीत जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तेथे गेले होते. मात्र, जागावाटपाचा मुद्दा आधी केंद्रीय नेत्यांसोबत हाताळला जाईल आणि त्यानंतरच स्थानिक पातळीवर अंतिम बोलणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा