अजित शंखवाळकरच्या पत्नीकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

बनावट आयुक्त प्रकरण : २७ लाखांच्या फसवणूक प्रकरणात पती फरार, आज सुनावणी

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
अजित शंखवाळकरच्या पत्नीकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

पणजी : बनावट उत्पादन शुल्क आयुक्त प्रकरणातील संशयित अजित शंखवाळकर याच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी उत्पादन शुल्क खात्याचे साहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. अजित शंखवाळकर याने मनोज तळेकर याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन २७ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अश्विन चंद्रू (आयएएस) यांच्या नावाने तळेकर याला आयुक्तपदाचा पदभार सोपविल्याचे पत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अजित शंखवाळकर फरार झाल्यानंतर पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी त्याच्या पत्नीची चौकशी केली. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावून तिला २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले. याची दखल घेऊन अजित शंखवाळकर याच्या पत्नीने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

पती बेपत्ता असल्याची पत्नीची तक्रार

आपला या गुन्ह्यात सहभाग नसतानाही पोलिसांकडून खोट्या प्रकरणात अटक होण्याची भीती पत्नीने जामीन अर्जात व्यक्त केली आहे. पती ८ ऑक्टोबरपासून बेपत्ता असून, त्याचा शोध लागत नसल्याने १३ ऑक्टोबर रोजी आपण पोलिसांत तक्रार दिली होती, असेही तिने नमूद केले आहे. पोलिसांना यापूर्वी चौकशीत सहकार्य केल्याचे सांगत, अर्जावर निर्णय होईपर्यंत अंतरिम दिलासा देण्याची मागणी तिने केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा