अपघातग्रस्त मर्सिडीज कार.
गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
दुर्गिणी-धारबांदोडा येथे मर्सिडीज कार व मालवाहू ट्रक यांच्यात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात सुमन पॉल (५३, बंगळुरू) व त्यांची पत्नी सिंधू मूर्ती (४८, बंगळुरू) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सीमा रमेश शिक्के (५३, वास्को, मूळ बंगळुरू) ही महिला गांभीर जखमी झाली. त्यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी कुळे पोलिसांनी ट्रकचालक नागराज भजंद्री याला ताब्यात घेतले आहे. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेलविटो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप निंबाळकर आणि सानित कवळेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केए ०३ एनटी ३०२१ क्रमांकाची मर्सिडीज कार बंगळुरूहुन वास्को येथे जात होती. दुर्गिणी धारबांदोडा येथे सुसाट वेगाने धावणाऱ्या मर्सिडीज कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या केए २६ ए ४७४२ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला समोरासमोर जोरदार टक्कर बसली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलट दिशेने स्थिरावली. अपघातात कारचालक सुमन पॉल व त्यांच्या मागच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या पत्नी सिंधू मूर्ती यांचा जागीच मृत्यू झाला. समोर चालकाच्या बाजूला बसलेल्या सीमा शिक्के या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबोळीतील गोमेकॉ रुग्णालयात पाठवण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी बस अपघातात चालकाचा मृत्यू
दुर्गिणी धारबांदोडा येथे याच अपघातस्थळापासून २० मीटर अंतरावर दोन वर्षांपूर्वी २०२३ साली तेलंगणाहून गोव्यात येणाऱ्या बसचा अपघात झाला होता. भरधाव बस कोसळून बसचालकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर २६ प्रवासी जखमी झाले होते. बसमधील ९ प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
वळण अपघातप्रवण, उपाययोजनांची गरज
दुर्गिणी धारबांदोडा येथे ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या ठिकाणी माेठे वळण आहे. येथे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. या आंतरराज्य मार्गावरील धोकादायक वळणावर उपययोजना कराव्यात, अशी सातत्याने मागणी होत असूनही त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोव्यात येताना गाठले काळाने
सुमन पॉल व त्यांची पत्नी सिंधू मूर्ती हे सीमा रमेश शिक्के यांच्यासोबत बंगळुरूहून वास्कोकडे मर्सिडीज कारमधून येत होते. सीमा शिक्के या बंगळुरूत पॉल यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांना वास्काेतील त्यांच्या घरी पोचवून शनिवारी, रविवारी गोव्यात मुक्काम करायचा पॉल दाम्पत्याचा बेत होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.


