रस्त्यावरून चालताना बाजूने येणारी व्यक्ती अचानक लक्षात न येणे, रात्री गाडी चालवताना समोरचे पाहणे पूर्वीपेक्षा कठीण वाटणे, वाचताना अक्षरे धूसर दिसणे किंवा सरळ रेषा किंचित वाकड्या भासू लागणे, या अशा तक्रारी आहेत ज्यांकडे आपण दैनंदिन जीवनात सर्रास दुर्लक्ष करतो. अनेकदा आपण हे बदल शारीरिक थकवा, वाढते वय किंवा चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे होत असावेत असा समज करून घेतो. मात्र, दृष्टी कमी होण्याची सुरुवात नेहमीच अचानक डोळ्यांसमोर पूर्ण अंधार येण्याने होत नाही. डोळ्यांचे अनेक गंभीर आजार अतिशय हळूहळू आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता गंभीर रूप धारण करू शकतात.
ग्लॉकोमा अर्थात काचबिंदूमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतात. डायबेटिक रेटिनोपॅथीमध्येही सुरुवातीला काहीच त्रास जाणवत नाही. त्यामुळे दृष्टीमध्ये जाणवणारा अचानक किंवा सूक्ष्म बदल हा नेहमीच आजाराचे पहिले लक्षण असेल असे नाही. याच कारणामुळे मला स्पष्ट दिसते आहे, म्हणजे माझे डोळे पूर्णपणे ठीक आहेत, ही समजूत काही वेळा अत्यंत धोकादायक ठरू शकते.

दृष्टी धूसर होण्याआधीही डोळ्यांचे अंतर्गत नुकसान सुरू झालेले असू शकते. आपल्याला स्पष्ट दिसत असेल, वाचताना अडचण येत नसेल आणि डोळे दुखत नसतील, तर डोळे पूर्णपणे निरोगी आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, डोळ्यांच्या गंभीर आजारांमध्ये हीच गोष्ट फसवणूक करू शकते. वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनमध्ये मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होऊ शकतो आणि यात सरळ रेषा वाकड्या दिसणे हे सुरुवातीचे मुख्य लक्षण मानले जाते.

काही बदल मात्र तातडीचा इशारा असू शकतात. डोळ्यांसमोर अचानक मोठ्या प्रमाणात नवीन ठिपके किंवा धाग्यांसारख्या आकृत्या तरंगताना दिसणे, प्रकाशाच्या चमकदार शलाका दिसणे, बाजूच्या दृष्टीमध्ये सावली जाणवणे किंवा एखादा राखाडी पडदा दृष्टीसमोर आल्यासारखे वाटणे ही रेटिनाच्या आजाराची स्पष्ट लक्षणे असू शकतात. अशा वेळी विलंब न करता तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांशी संपर्क साधणे गरजेचे असते.

दृष्टी हळूहळू कमी होत असेल, तर संबंधित व्यक्तीला त्याची लगेच जाणीव का होत नाही, याविषयी डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वाती हिरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, दृष्टी हळूहळू कमी होत असल्यास मेंदू आणि ती व्यक्ती त्या बदलाशी नकळत जुळवून घेते. उदाहरणार्थ, एखाद्याला दूरचे कमी दिसत असेल, तर ती व्यक्ती वस्तू जवळून पाहण्याची सवय लावून घेते. त्यामुळे दृष्टी कमी होत असल्याचे लगेच जाणवत नाही. विशेषतः दोन्ही डोळ्यांमध्ये हळूहळू बदल होत असल्यास ही समस्या खूप उशिरा लक्षात येते. एका डोळ्याची दृष्टी कमी होत असताना दुसरा डोळा काही प्रमाणात समतोल साधतो. त्यामुळे दोन्ही डोळ्यांनी एकत्र पाहताना दृष्टी व्यवस्थित असल्यासारखी वाटू शकते. काचबिंदूसारख्या आजारात दृष्टीच्या कडेचा भाग हळूहळू कमी होत असल्याने सुरुवातीला त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही.

अशा बदलांमुळे दैनंदिन कामांमध्ये काही सूक्ष्म अडचणी जाणवू लागतात. रात्री वाहन चालवताना त्रास होणे, पायऱ्यांवर पाय ठेवताना अंदाज चुकल्याने तोल जाणे, चालताना आजूबाजूच्या व्यक्ती किंवा वस्तूंना धडकणे, वाचताना वारंवार ओळ चुकणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटण्यास त्रास होणे, हे या सूक्ष्म बदलांचे संकेत आहेत.
पेरिफेरल व्हिजन म्हणजे आपण समोर पाहत असतानाच आजूबाजूला दिसणारा परिसर. ही बाजूची दृष्टी कमी होताना व्यक्तीला वारंवार वस्तूंना धडकणे, गर्दीतून चालताना अडचण येणे किंवा रात्री व्यवस्थित न दिसणे असे अनुभव येतात. ग्लॉकोमामध्ये हा बदल अतिशय हळूहळू आणि वेदनारहित पद्धतीने होतो. मध्यवर्ती दृष्टी बराच काळ स्पष्ट राहिल्यामुळे समस्या गंभीर होईपर्यंत बाजूची दृष्टी कमी झाल्याचे लक्षात येत नाही. तसेच, रात्री पाहण्यात अडचण आणि त्यानंतर हळूहळू कमी होत जाणारी बाजूची दृष्टी ही 'रेटिनायटिस पिग्मेंटोसा' या अनुवंशिक आजाराशीही संबंधित असू शकते. अनेकदा चष्म्याने दृष्टी स्पष्ट होणे आणि डोळे पूर्णपणे निरोगी असणे यातील फरक लोकांना समजत नाही. यावर स्पष्टीकरण देताना डॉ. स्वाती हिरे सांगतात की, चष्म्यामुळे केवळ नंबरचा दोष दूर होऊन दृष्टी स्पष्ट होते. मात्र, त्यामुळे डोळ्यांमध्ये कोणताही अंतर्गत आजार नाही, असे सिद्ध होत नाही. काचबिंदू किंवा डोळ्याच्या पडद्याशी संबंधित आजार सुरुवातीला चष्म्याने दृष्टी स्पष्ट असतानाही अस्तित्वात असू शकतात. चष्म्याचा नंबर तपासताना प्रामुख्याने दृष्टी किती स्पष्ट होते हे पाहिले जाते, तर डोळ्यांच्या संपूर्ण तपासणीमध्ये डोळ्यांचा अंतर्गत दाब, पडदा, ऑप्टिक नर्व्ह आणि इतर घटकांची सूक्ष्म तपासणी केली जाते.

दृष्टी कमी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांबाबत मुंबईतील एएसजी हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सुविरा जैन यांनी सांगितले की, डोळ्याचा नेमका कोणता भाग प्रभावित झाला आहे, यावर दृष्टीतील बदल अवलंबून असतात. ग्लॉकोमाच्या बहुतांश प्रकारांत सुरुवातीला वेदना होत नाहीत. वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनमध्ये मध्यवर्ती दृष्टी हळूहळू कमी होते आणि सरळ रेषा लाटांसारख्या दिसू लागतात. रेटिनल डिटॅचमेंटमध्ये डोळ्यांसमोर काळे ठिपके, प्रकाश चमकणे किंवा बाजूची दृष्टी कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

आजच्या काळात लहान मुलांमधील मायोपिया, म्हणजे जवळचे स्पष्ट पण दूरचे अस्पष्ट दिसण्याची समस्या वेगाने वाढत आहे. संशोधनानुसार २०५० पर्यंत शहरी भारतीय मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण तब्बल ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतात ग्लॉकोमाच्या सुमारे ९० टक्के प्रकरणांचे वेळेवर निदानच होत नाही, कारण सुरुवातीला कोणतीही वेदना होत नाही. ग्लॉकोमामुळे एकदा गेलेली दृष्टी पुन्हा पूर्ववत मिळवता येत नाही, केवळ पुढील नुकसान रोखता येते. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्ती, चाळीशी पार केलेले नागरिक, तसेच ज्यांच्या कुटुंबात ग्लॉकोमाचा इतिहास आहे, त्यांनी डोळ्यांच्या तपासणीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. दीर्घकाळ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइडयुक्त आय ड्रॉप्स वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी चाळीशीनंतर दर दोन वर्षांनी किंवा गरजेनुसार दरवर्षी डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे हितकारक ठरते. मुलांनी दिवसातून किमान दोन तास घराबाहेर मोकळ्या हवेत खेळणे मायोपियाचे प्रमाण रोखण्यास मदत करते. तसेच, धूम्रपान टाळणे आणि उन्हात फिरताना युव्ही प्रोटेक्शन असलेल्या चष्म्यांचा वापर करणे डोळ्यांच्या दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत दृष्टीमध्ये किंचितही फरक जाणवल्यास स्वतःहून उपचार न करता तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणेच श्रेयस्कर ठरते.
टीप : वरील लेख केवळ माहितीपर आहे. आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.


