सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा

नानोडा, बांबर, कोदाळ, देरेवाड्यात मोठे नुकसान : रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
23rd October, 11:31 pm
सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा

वाळपई : शुक्रवारी संध्याकाळी सत्तरी तालुक्याच्या विविध भागांत आलेल्या जोरदार मुसळधार पावसाने आणि अचानक झालेल्या चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला. नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा, बांबर, कोदाळ आणि देरेवाडा या गावांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून शेती-बागायती, घरे आणि वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती, मात्र वाळपई अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले.
शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास वाळपई शहरासह परिसरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. याच वेळी नगरगाव पंचायत क्षेत्रात वादळी वाऱ्याने तांडव घातले. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान आलेल्या या चक्रीवादळामुळे स्थानिक नागरिकांची मोठी धांदल उडाली.
या चक्रीवादळामुळे नानोडा व बांबर येथील मिलिंद बर्वे, विष्णू जोशी, प्रशांत मराठे या बागायतदारांसह अनेक शेतकऱ्यांच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, सुपारी आणि नारळाची झाडे मुळासकट उखडून पडल्याने बागायतदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे एकूण नुकसानीचा अचूक अंदाज आलेला नसून, शनिवारी संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतरच वास्तविक आकडा स्पष्ट होईल, असे बागायतदार मिलिंद बर्वे व प्रशांत मराठे यांनी सांगितले.
नानोडा येथील सुशीला नारायणगावकर यांच्या घरावर शेजारील आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने घराच्या पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नगरगाव-बांबर मुख्य रस्त्यावर ५ ठिकाणी मोठी झाडे पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाडे कापून हटविल्याने वाहतूक पूर्ववत झाली.
वादळामुळे १० हून अधिक विजेचे खांब मोडल्याने वीज यंत्रणा पार कोलमडली आहे. अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला असून वाळपई वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
कृषी विभागाकडून आज पाहणी
या दुर्घटनेबाबत माहिती देताना वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी कृषी अधिकारी प्रत्यक्ष बाधित भागात भेट देऊन नुकसानीचा पंचनामा व आढावा घेतील. या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून त्वरित वरिष्ठांकडे सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


नडके-खोतीगाव येथे घरावर वीज पडून २ लाख रुपयांचे नुकसान
काणकोण : खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नडके येथील सुधाकर भिसो गावकर यांच्या घरावर विज पडून झालेल्या अपघातात घराचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना घडली त्या वेळी घरातील एका खोलीत सुधाकर गावकर हे झोपले होते, मात्र सुदैवाने ते दुसऱ्या खोलीत असल्याने या भीषण दुर्घटनेतून त्यांचे प्राण थोडक्यात बचावले.
शुक्रवारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ही दुर्घटना घडली. वीज कोसळल्यामुळे घरातील सर्व विद्युत उपकरणे पूर्णपणे नष्ट झाली. विजेचा तीव्र झटका भिंत पार करून थेट घरात शिरल्याने फ्रीज आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या.
या दुर्घटनेची माहिती मिळताच सरपंच जयेश गावकर आणि रजनीश गावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्तांची सांत्वनपर भेट घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला. शुकवारी काणकोण तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असला, तरी अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच पावसामुळे काही तास वीजपुरवठाही खंडित झाला होता.

हेही वाचा
सर्व पहा