पेडणेच्या श्रीशा कळंगुटकरची राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात ‘मॅजिक हार्वेस्टो स्प्रेयर’ प्रकल्पाचे कौतुक

Story: गोवन वार्ता। विशेष प्रतिनिधी |
just now
पेडणेच्या श्रीशा कळंगुटकरची राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी

पेडणे : तोरसे-पेडणे येथील शहीद रामसिंग मेमोरियल सरकारी माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी श्रीशा साहिल कळंगुटकर हिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कल्पकतेची छाप उमटवत गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित प्रतिष्ठित ‘इन्स्पायर मानक’ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत तिच्या ‘मॅजिक हार्वेस्टो स्प्रेयर’ या अभिनव प्रकल्पाचे विशेष कौतुक झाले.
१२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे हे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. देशभरातून सादर करण्यात आलेल्या सुमारे ११ लाख प्रकल्पांमधून निवड झालेल्या केवळ ७९० उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये श्रीशाच्या प्रकल्पाचा समावेश झाला. गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ चमूंमध्ये सहभागी होत तिने आपल्या कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले.
सुपारीच्या उंच झाडांवर चढण्याचा धोका कमी करून सुपारी काढणी आणि औषध फवारणी सुलभ करण्याच्या उद्देशाने श्रीशाने ‘मॅजिक हार्वेस्टो स्प्रेयर’ हे उपकरण विकसित केले आहे. दोरी आणि पुली या साध्या यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे उपकरण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. शेतीतील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर सोपा आणि प्रभावी उपाय शोधण्याचा तिचा प्रयत्न या प्रकल्पातून दिसून येतो.
श्रीशाने यापूर्वी ‘इन्स्पायर मानक’ योजनेंतर्गत ‘झिरो वेस्ट फार्मिंग’ आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘इंटिग्रेटेड फार्म सिस्टीम’ हे प्रकल्प सादर केले होते. या दोन्ही प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झाली होती.
या प्रकल्पांसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक साहिल नवसो कळंगुटकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. माजी मुख्याध्यापिका राजेश्री रेडकर, ममता नाईक आणि विद्यमान मुख्याध्यापक नरेंद्र म. नाईक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.
तोरसे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
श्रीशाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक संघाने तिचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक आणि संशोधनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा
सर्व पहा