कंपनीतील एका स्फोटामुळे सांगेच्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त

भाटी-सांगे येथील वैभव गावकर यांची व्यथा : कंपनीने सहकार्य करण्यास नकार दिल्याने कुटुंब चिंतेत

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
22nd October, 06:18 pm
कंपनीतील एका स्फोटामुळे सांगेच्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त

सांगे : भाटी-सांगे येथे राहणारे आणि काकोडा येथील एका कंपनीत काम करणारे वैभव उमाकांत गावकर यांच्यावर काम करताना काळाने घाला घातला. मशिनमध्ये पावडर भरत असताना अचानक स्फोट झाल्याने त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. त्यांच्या पाठीवरही जखमा झाल्या आहेत. या अपघातामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले असून, त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. अपघातानंतर कंपनी आणि ईएसआयकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप वैभव यांनी केला आहे.

वैभव गावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली.

वैभव गावकर हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत. त्यांच्यासोबत त्यांची आई राहते. दीड वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले असून, त्यांना सात ते आठ महिन्यांचा मुलगाही आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा आधार असलेल्या वैभव यांच्यावर आलेल्या संकटामुळे त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अनिश्चित झाले आहे.

वैभव यांनी यापूर्वी काकोडा येथील एका कंपनीत पाच वर्षे काम केले होते. त्यानंतर ते दुसऱ्या कंपनीत कामाला लागले. मात्र, या कंपनीत काम करत असताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. या कठीण काळात मंत्री सुभाष फळदेसाई त्यांना मदतीचा आधार देत असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वैभव यांनी सांगितले. मात्र, ज्या कंपनीत काम केले, त्या कंपनीकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. न्याय मिळावा आणि कंपनीने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशिक्षणाशिवाय काम करण्यास भाग पाडले

वैभव यांनी सांगितले की, कंपनीने कामाचे स्वरूप आणि मशिन चालवण्याबाबत कोणतेही योग्य प्रशिक्षण किंवा आवश्यक माहिती दिली नव्हती. इतर कामगारांकडून काम पाहूनच काम करावे लागत होते. आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसतानाही मशिनवर काम करून घेतले जात होते. मशिनमध्ये पावडर भरत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. त्यांच्या पाठीवरही जखमा झाल्या.

कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याच्या उपचारांची आणि पुढील मदतीची जबाबदारी कंपनीने घ्यायला हवी. मात्र, संबंधित कंपनीकडून केवळ आश्वासने दिली जात असून, प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याचे वैभव यांनी सांगितले.

पीएफ, ईएसआयचे पैसे कापूनही मदत नाही

कंपनीकडून दरमहा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ईएसआयसाठी पैसे कपात केले जात होते. असे असतानाही अपघातानंतर ईएसआयकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या इतरांच्या मदतीच्या आधारावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार आर्थिक आणि आवश्यक वैद्यकीय मदत करावी, तसेच आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आधार द्यावा, अशी आर्त विनंती वैभव गावकर यांनी केली आहे.

कंपनीच्या कामामुळे माझ्या पतीचे हात निकामे झाले आहेत. ते एकमेव कमवणारे असल्याने आम्ही संकटात आहोत, त्यासाठी कंपनीने त्यांना नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे, अशी विनंती अपर्णा गावकर यांनी केली. 

कंपनीने आर्थिक मदत करावी : फळदेसाई

वैभव यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर कंपनीच्या एचआरशी अनेकदा संपर्क साधला; मात्र भेटण्याची आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही हालचाल झालेली नाही. वैभव यांना पुरेशा सुरक्षेविना मशीनवर काम करताना अपघात झाला. त्यांच्या हातांची बोटे चिकटल्याने त्यांना भविष्यात काम करणेही कठीण झाले आहे. पत्नी, लहान मूल, आई आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना कंपनीने त्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. कंपनीने एकरकमी तडजोड करून वैभव यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले.



हेही वाचा
सर्व पहा