फोंडा : धारबांदोडा आणि साकोर्डा परिसरात गेल्या गणेश चतुर्थीपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शिवडे येथील रगाडा नदीवर बसविण्यात आलेल्या पंपांच्या माध्यमातून या भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या तीन महिन्यांत सहा पंप जळाल्याने पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. सध्या दुरुस्ती केलेल्या एका २५ एचपी पंपाच्या साहाय्याने पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याच्या टाक्याही पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नवीन ४० एचपी पंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
धारबांदोडा भागात गणेश चतुर्थीपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शिवडे येथील पंपमधून धारबांदोडा व साकोर्डा भागात पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ४० एचपी पंप बसवून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, ३ महिन्यांपूर्वी ४० एचपी पंप जळून गेल्यानंतर २५ एचपी पंप वापरण्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, विजेच्या उच्च दाबामुळे पंप वारंवार जळून जात आहेत. गेल्या ३ महिन्यांत ६ पंप जळून गेले आहेत. यात ४० एचपीचे २ तर २५ एचपीचे ४ पंप जळून गेले आहे. जळून गेलेले पंप वारंवार दुरुस्ती करून तेच वापरले जात आहेत. काही दिवसांपासून तर २५ एचपी पंप सुरू असल्याने जवळील टाक्यांत पाणी भरत नाही. त्याचा फटका लोकांना सोसावा लागत आहे.
पेटके- धारबांदोडा भागात गणेश चतुर्थीपासून नळातून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे लोकांना वाहनातून परिसरातील झऱ्याचे किंवा नातेवाईकांच्या घरातून पाणी आणावे लागत आहे. पाण्याची समस्या असल्याने स्थानिक लोक वारंवार बांधकाम खात्याच्या कार्यलयात जाऊन तक्रारी करू लागले आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांना संजीवनी साखर कारखान्यासमोरील नवीन बांधलेली टाकी जवळ आहे. पण सदर टाकी फोंडा विभागात येत असल्याने लोकांना पाणी समोर असून घरात नळ कोरडे म्हणण्याची वेळ आली आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवसांपासून पाण्याची टंचाई होत आहे. बांधकाम खात्याचे कार्यालय अवघ्या २०० मीटर अंतरावर असल्याने वारंवार त्यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली जात आहे. मात्र, पाणी पुरवठा सुरुळीत होत नाही. त्यामुळे वाहनातून नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी आणावे लागत आहे. बांधकाम खात्याने लोकांना आश्वासने देण्याऐवजी सुरळीत पाणी पुरवठा करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे चंद्रशेखर च्यारी यांनी सांगितले.
जास्त क्षमतेचा पंप बसविण्याची मागणी
शिवडे येथील रगाडा नदीवर बसविण्यात आलेला २५ एचपी पंप सकाळी ६.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतो. त्यामुळे पंपमधून कमी प्रमाणात पाणी टाक्यांत जात असल्याने पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाही. त्यामुळे नवीन ४० एचपी पंप बसविल्यास त्याचा निश्चित लाभ होणार असल्याचा दावा स्थानिक लोक करीत आहेत. मात्र, बांधकाम खाते नवीन पंप बसविण्यात अपयशी ठरल्याने लोक संताप व्यक्त करीत आहेत.


