‘एका फोन कॉलने वाचू शकतो जीव’; आपत्कालीन स्थितीत ११२ डायल करा : आयजीपी

नाना पाटेकर यांच्या ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनानंतर पोलिसांची जागृती; दोनापावला येथे स्टार अभिनेते नाना पाटेकर यांना ह्रदयात कळा येऊ लागल्यानंतर त्यांना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात जागृतीही सुरू केली आहे. पोलिसांनी आपत्कालीन स्थितीत त्वरीत मदत मिळवण्यासाठी ११२ क्रमांकावर तर अमलीपदार्थांसंदर्भात माहिती, समुपदेशन किंवा मदतीसाठी १९३३ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


4 hours ago
‘एका फोन कॉलने वाचू शकतो जीव’; आपत्कालीन स्थितीत ११२ डायल करा : आयजीपी

पणजी : दोनापावला येथे स्टार अभिनेते नाना पाटेकर यांना मध्यरात्रीनंतर ह्रदयात कळा येऊ लागल्यानंतर त्यांना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात जागृतीही सुरू केली आहे. पोलिसांनी आपत्कालीन स्थितीत त्वरीत मदत मिळवण्यासाठी ११२ क्रमांकावर तर अमलीपदार्थांसंदर्भात माहिती, समुपदेशन किंवा मदतीसाठी १९३३ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२६ आणि अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी देशभर आयोजित केलेली रॅली गोव्यात दाखल झाली. त्यानिमित्त कुंकळ्ळी येथे एनआयटी आवारात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) केशव राम  चौरासिया (IGP of Goa Police Shri K. R. CHAURASIA, IPS)  यांनी वरील आवाहन केले. आपत्कालीन स्थितीत वेळेत मदत न मिळाल्याने नामांकित अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना जीव गमवावा लागला. या घटनेचा खास उल्लेख करत त्यांनी कुठल्याही आपत्कालीन स्थितीत ११२ तर अमलीपदार्थांसंदर्भातील माहिती, समुपदेशन किंवा मदतीसाठी १९३३ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.

केरळमधून सुरू झालेल्या या आंतरराज्यीय रॅलीचे पोळे सीमातपासणी नाक्यावर गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. या मोहिमेत गोवा पोलिसांचे ११ दुचाकीस्वार सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे आणि युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.

केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकातील दुचाकीस्वारांचा समावेश असलेली ही रॅली ३० ऑक्टोबर रोजी गुजरात येथे पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जात आहे.

एनआयटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

रॅली गोव्यात दाखल झाल्यानंतर कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी गोवा) परिसरात अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात २५० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्थानिक मान्यवर सहभागी झाले होते.

पोलीस महानिरीक्षक चौरासिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडण्याबरोबरच सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याचे सांगितले. कोलंबिया आणि इतर देशांची उदाहरणे देत अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचे जाळे नियंत्रणाबाहेर गेल्यास अर्थव्यवस्था आणि प्रशासनावर गंभीर परिणाम होत असतात; असे त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी अमली पदार्थांशी संबंधित गैरप्रकारांची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘एका फोन कॉलने वाचू शकतो जीव’

आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी सरकारच्या हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन चौरसिया यांनी केले. अमली पदार्थांबाबत मदत, समुपदेशन आणि गोपनीय माहिती देण्यासाठी १९३३ या राष्ट्रीय ‘मानस’ हेल्पलाईनचा, तर तातडीच्या आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आपत्कालीन प्रसंगी वेळेत माहिती दिल्यास मोठी दुर्घटना टाळण्यास मदत होऊ शकते. ‘एका फोन कॉलने एखाद्याचा जीव वाचू शकतो’, हा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.

२५० विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची शपथ

कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची, मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याची आणि अमली पदार्थांशी संबंधित गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देण्याची शपथ घेतली. एनआयटीचे संचालक प्रा. ओमप्रकाश जैस्वाल यांनीही अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट केले. यावेळी गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष उपस्थित होते. नोडल अधिकारी पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी स्वागत केले, तर अमली पदार्थविरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी आभार मानले.