पणजी : नरकासुराच्या नावाखाली चालणारा धिंगाणा बंद व्हायला हवा. नरकासुराची प्रतिमा बनवितात त्याला मी कला म्हणत नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. यानंतर दै. ‘गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या विशेष उपक्रमांतर्गत याबाबत वाचकांची मते मागवली. वाचकांनी यावर विविध मते वर्तवली आहेत. नरकासुर दहन ही गोव्याची परंपरा आहे. त्याला विरोध करू नये. मात्र, यानिमित्ताने होणारा धिंगाणा टाळावा, अशी अनेकांनी मते व्यक्त केली.
वीजमंत्री अगदी बरोबर बोलले आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. मग मुख्य मुद्दा असा आहे की, नरकासुराला कोणी निर्माण केले आणि त्याचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी काय आहे?- किशोर पागी
३१ डिसेंबरचा धिंगाणा चालतो. मात्र, हिंदूंचा सण असला की त्रास होतो का?- गुरुराज कणबर्गी
मंत्री सुदीन ढवळीकर योग्य तेच बोलले आहेत. आज नरकासुराच्या निमित्ताने जो धिंगाणा होत आहे ती खरीच चिंतनीय बाब आहे.- आनंदू देसाई
भगवान श्रीकृष्ण आणि नरकासुराच्या युद्धाला माझा विरोध नाही, कारण त्यामुळे पारंपरिक कथा जिवंत राहील. मात्र, यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळपट्टी करणे आणि ध्वनिप्रदूषण करणे टाळले पाहिजे.- जयवंत जोसलकर
नरकासुराला जाळून दिवाळी साजरी करण्याची ही गोव्याची परंपरा आहे. ही परंपरा बंद करण्याचा प्रयत्न करू नका. - दिलीप कारापूरकर
कचरा जाळून परिसराची साफसफाई करून दिवाळी साजरी करायची असते. मात्र, आता नरकासुराच्या नावाखाली सत्तेसाठी हपापलेले लोक पैसे ओतून मुलांना नरकासुर बनवण्यासाठी पुढे करतात. नरकासुराचे पुतळे रस्त्यावर जाळून कचरा पसरवून दिवाळी साजरी करू नये. - अनिल नाईक
नरकासुर ही गोव्याची शान आहे, ती बंद करू नये. पण त्या नावाखाली जो धिंगाणा, मोठ्या आवाजात डीजे, दारू पिऊन रात्रभर जो गोंधळ चालतो तो नक्कीच बंद व्हायला हवा. सरकारने वेळेचे बंधन (रात्री ११ पर्यंत) आणि पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्याचे नियम घालावेत. परंपरा जपा, पण धिंगाणा नको.- राजेंद्र पेडणेकर
नरकासुर दहन आमचा अधिकार, आम्ही तो बजावणारच! काही लोक ही प्रथा बंद करू पाहत आहेत. याला आमचा विरोध आहे. - राज गावडे


