फोंडा :राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने म्हैसाळ धरणातील पाणीसाठा खालावला आहे. त्यातच धरणात तब्बल ४० टक्के गाळ साचल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या ऐन महिन्यांत शिरोडा, पंचवाडी आणि बोरी पंचायत क्षेत्रातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेवर परिणाम
म्हैसाळ धरणातून शिरोडा, पंचवाडी आणि बोरी पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात धरणात पाणी साठवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे नागरिकांना पाणी दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असूनही तो उपसण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना केलेली नसल्याचे सांगितले जाते.
धरणात सुमारे ४० टक्के गाळ साचल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा साठा अत्यल्प झाला आहे. यापूर्वीही पाणीसाठा खालावल्याने दोन-तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यामुळे यंदा पुन्हा एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची चिंता नागरिकांना सतावत आहे.
ओपा प्रकल्पासाठी आधीच उपाययोजना
दुसरीकडे, फोंडा आणि तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ओपा प्रकल्पात सध्या आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जलस्रोत खात्याने धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर नदीवरील १३ बंधाऱ्यांमध्ये आताच पाणी अडवून साठवून ठेवले आहे.
सामान्यतः दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे पाणी साठवले जाते. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अभियंत्यांनी आधीच खबरदारी घेतली आहे.
खाणींतील पाणी उपसण्याचा पर्याय
ओपा प्रकल्पातील पाणीसाठा कमी पडल्यास खाणींच्या खड्ड्यांमधील पाणी उपसा करून प्रकल्पासाठी सोडण्याची पर्यायी व्यवस्था आहे. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्याने जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच हे पंप सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओपा आणि म्हैसाळ धरणातील पाणीसाठ्याबाबत अधिकृत माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम आणि जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी टाळाटाळ केली आहे. मात्र, नाव न छापण्याच्या अटीवर काही वरिष्ठ अभियंत्यांनी यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
ओपा प्रकल्पापेक्षा म्हैसाळ धरणातील पाणीसाठ्याबाबत अभियंते अधिक चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्याने आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाणीप्रश्न हाताळताना दोन्ही खात्यांच्या अभियंत्यांची मोठी धावपळ उडू शकते, असे संकेत आहेत.
धरणे बांधण्यापेक्षा संवर्धन गरजेचे : पारकर
यंदा पाऊस कमी झाल्याने पाणीपुरवठ्यावर निश्चितच प्रतिकूल परिणाम होणार आहे. सरकार धरणातील गाळ उपसण्यासारखी मूलभूत कामे करण्याऐवजी नवे बंधारे आणि धरणे बांधण्याच्या केवळ घोषणा करण्यात व्यस्त आहे. अस्तित्वात असलेल्या जलसाठ्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सरकारकडून होत नाहीत. त्याचा गंभीर परिणाम सर्वसामान्य जनतेच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे, अशी प्रतिक्रिया खांडेपार येथील रहिवासी संदीप पारकर यांनी व्यक्त केली.
म्हैसाळ धरणातील गाळ उपसणे, पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि उन्हाळ्यापूर्वी पर्यायी उपाययोजना निश्चित करणे, या बाबींना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी उन्हाळ्यात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळण्यासाठी संबंधित खात्यांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे शिरोडा, पंचवाडी आणि बोरी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


