मालमत्ता जाहीर न करणाऱ्यांत आमदारांसह १२०० जणांचा समावेश

यादीत आमदार अॅलेक्स सिक्वेरा यांचेही नाव

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
13th October, 11:45 pm
मालमत्ता जाहीर न करणाऱ्यांत आमदारांसह १२०० जणांचा समावेश

पणजी : गोवा लोकायुक्त कायदा २०११ च्या कलम २१ (१) नुसार, सार्वजनिक पदावर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, हा तपशील सादर करण्यात अपयशी ठरलेल्या सुमारे १२०० लोकप्रतिनिधींची नावे लोकायुक्त कार्यालयाने जाहीर केली आहेत. या यादीत नुवेचे आमदार अॅलेक्स सिक्वेरा, पणजीतील सहा नगरसेवक, इतर १३२ नगरसेवक, १९ जिल्हा पंचायत सदस्य आणि अनेक पंचांचा समावेश आहे.

या यादीत सर्वाधिक नावे पंचांची आहेत. पंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य तसेच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या मालमत्तेचा तपशील लोकायुक्तांकडे सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर दरवर्षी ५ नोव्हेंबरपूर्वी विहित नमुना क्रमांक ३ मध्ये ही माहिती सादर करावी लागते.

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत असताना मालमत्तेचा तपशील सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी जाहीर झाल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मालमत्तेचा तपशील वेळेत सादर करणे अपेक्षित असताना अनेकांनी या नियमांचे पालन केले नसल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे.

मुदत उलटूनही मालमत्तेचा तपशील नाही

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्तेचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर २०२५ होती. यासंदर्भात नोटीस बजावूनही ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी मालमत्तेचा तपशील सादर केला नाही, त्यांची नावे संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच, या लोकप्रतिनिधींची यादीही लोकायुक्त कार्यालयाने सार्वजनिक केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा