८५ वर्षीय रुग्णावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘टीएव्हीआय’ उपचार यशस्वी

गंभीर हृदयविकार, अनेक सहआजार असलेल्या रुग्णांना दिलासा

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
13th October, 11:32 pm
८५ वर्षीय रुग्णावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘टीएव्हीआय’ उपचार यशस्वी

अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये रुग्णावर टीएव्हीआय उपचारपद्धतीद्वारे उपचार केल्यानंतर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ माचनूरकर आणि त्यांची वैद्यकीय टीम.

कोल्हापूर : वयाची ८५ वर्षे आणि हृदयविकारासह किडनी डिसीज, अॅनिमिया व अस्थमा यांसारखे गंभीर सहआजार असलेल्या रुग्णावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आधुनिक ‘टीएव्हीआय’ उपचारपद्धतीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.
रुग्णाला हृदयाची एओर्टिक झडप अरुंद झाल्याचा गंभीर त्रास होता. वाढते वय आणि सहआजारांमुळे पारंपरिक शस्त्रक्रियेचा धोका लक्षात घेऊन तज्ज्ञांनी टीएव्हीआय उपचारपद्धती निवडली. या प्रक्रियेत रक्तवाहिनीद्वारे नवीन झडप बसवली जाते.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ माचनूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्यान रुग्णाला काही काळ व्हेंटिलेशनची मदत द्यावी लागली, तसेच पेसमेकर बसवण्यात आला. उपचारानंतर झडपेवरील दाबातील फरक कमी झाला आणि स्ट्रोक किंवा रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत आढळली नाही.
योग्य वैद्यकीय मूल्यांकन आणि संपूर्ण टीमच्या समन्वयामुळे उपचार यशस्वी झाल्याचे डॉ. माचनूरकर यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च जोखमीच्या रुग्णांनाही प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाने नमूद केले.
काय आहे ‘टीएव्हीआय’ उपचारपद्धती?
टीएव्हीआय (ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन) ही हृदयाची अरुंद झालेली झडप बदलण्याची आधुनिक उपचारपद्धती आहे. हृदयातील एओर्टिक व्हॉल्व्ह ही झडप अरुंद झाल्यास शरीराला रक्तपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे धाप लागणे, थकवा येणे आणि हार्ट फेल्युअरसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.       

हेही वाचा
सर्व पहा