उन्हाची काहिली, घामाच्या धारा... पारा ३७ अंश पार

पणजीमध्ये ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद : ऑक्टोबरमधील ६१ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
13th October, 11:36 pm
उन्हाची काहिली, घामाच्या धारा... पारा ३७ अंश पार

पणजी : मागील काही दिवसांत राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी पणजीमध्ये कमाल ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे मागील ६१ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. याआधी पणजीत १६ ऑक्टोबर २००८ रोजी ३७.२ अंश तर २५ ऑक्टोबर २००८ रोजी ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

हवामान खात्याने १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यानुसार, या दिवसांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने १९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर उकाडा कायम राहणार आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात सर्वसाधारण कमाल तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकने वाढ झाली आहे. मंगळवारी मुरगावमध्ये कमाल ३६.४ अंश व किमान २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पणजीमधील किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मंगळवारी पणजीतील जाणवणारे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. यादरम्यान सापेक्ष आर्द्रता ५० ते ८५ टक्के पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी सूचना

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी सुती कपडे वापरणे, उन्हापासून डोक्याचे संरक्षण करणे, घराची दारे, खिडक्या उघडे ठेऊन हवा खेळती राहील, याची काळजी घेणे, सतत पाणी पित राहणे, अशा सूचना खात्याने केल्या आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा