पैंगीण : काणकोण तालुक्यातील मोखर्ड, श्रीस्थळ आणि मास्तीमळ परिसरात वारंवार पाईपलाईन फुटणे आणि मोठ्या प्रमाणात पाणीगळती होण्याच्या प्रकारांमुळे नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काही भागांतील नळ पूर्णपणे कोरडे असल्याने स्थानिक नागरिकांसह सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
चापोली धरणातून काणकोण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गालगत अवजड यंत्रसामग्रीचा वापर करणे कठीण जात असल्याने अनेकदा केवळ मनुष्यबळाच्या साहाय्यानेच दुरुस्तीची कामे करावी लागतात. परिणामी, आपत्कालीन दुरुस्तीला विलंब होऊन त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे.
स्थानिक पंचायत सदस्य रामू नाईक यांनी या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोखर्ड, श्रीस्थळ आणि काणकोण परिसरातील काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. विशेषतः मोखर्ड परिसरात नळाच्या पाण्याव्यतिरिक्त पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दैनंदिन स्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, मूलभूत गरजा भागवण्यासाठी नागरिकांना बाटलीबंद पाणी किंवा टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, असे रामू नाईक यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर: सहाय्यक अभियंता
काणकोण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, मोखर्ड परिसरातील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने आता तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि प्रभावित भागांतील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी जोरदार मागणी काणकोणवासीयांकडून केली जात आहे.


