रात्री बसमध्येच राहणाऱ्या चालक-कंडक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कदंब महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
08th October, 12:14 am
रात्री बसमध्येच राहणाऱ्या चालक-कंडक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पणजी : रिवे सत्तरी येथे कदंब बसच्या चालक आणि कंडक्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कदंब बसचे चालक आणि कंडक्टर रात्री बसमध्येच मुक्काम करून सकाळी पुन्हा सेवेत रुजू होतात. मात्र, या कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी त्यांच्यावर कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसच्या अंतिम थांब्यांवर चालक-कंडक्टरांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कदंब बसवर तैनात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील काही मार्गांवर त्यांची ड्युटी अंतिम थांब्यावर संपते आणि सकाळी त्याच ठिकाणाहून पुन्हा सुरू होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ज्या गावात अंतिम थांबा असतो, तेथे चालक आणि कंडक्टरना मुक्काम करावा लागतो. मात्र, या ठिकाणी त्यांच्या राहण्याची, स्वच्छतागृहाची किंवा अन्य मूलभूत सुविधांची व्यवस्था नसते.

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना अंधारात एकाकी ठिकाणी बस उभी करून त्याच बसमध्ये जेवण आणि झोप घ्यावी लागते. या अतिरिक्त त्रासासाठी कदंब वाहतूक महामंडळाकडून कोणतीही भरपाई दिली जात नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. डेपोमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मुक्कामाची सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील अंतिम थांब्यांवरही अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एका कर्मचाऱ्याने केली.

यासंदर्भात कदंब वाहतूक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, केवळ गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही चालक आणि कंडक्टर बसमध्येच मुक्काम करतात, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी अंतिम थांबा असतो, त्या परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चालक आणि कंडक्टर म्हणून नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना आपली दुचाकी तेथे ठेवून ड्युटी संपल्यानंतर रात्री घरी जाण्याची आणि सकाळी पुन्हा येण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही कर्मचारी त्याच गावातील असल्याने त्यांना घरी जाऊन जेवण करून व विश्रांती घेऊन सकाळी ड्युटीवर येणे शक्य होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सुरक्षित ठिकाणी मुक्कामाची सूचना

बस ही चालक आणि कंडक्टरच्या जबाबदारीचा भाग असल्याने ड्युटी संपल्यानंतरही ते बस सोडून दूर जाऊ शकत नाहीत. बस सुरक्षित राहावी यासाठी त्यांना बसजवळच मुक्काम करावा लागतो. त्यामुळे चालक-कंडक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतिम थांब्याच्या परिसरातील पोलीस चौकी, पंचायत कार्यालय किंवा शाळेच्या आवारात बस उभी करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा